मुंबई । प्रतिनिधी Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दिदींसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे बोलून दाखवला. भाजपच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ या अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठविलेल्या हजारो राख्या सुपूर्द करण्याचा सोहळा आज संपन्न झाला. लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या फडणवीस यांनी सन्मानपूर्वक स्वीकारल्या. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यातील एक कोटी महिलांना लखपती करणार असल्याचे जाहीर केले.
महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत पण महिलांसाठी सुरु केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी यावेळी दिली.
राज्यभरातील बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहिणींच्या ऋणातच रहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही. निरपेक्ष प्रेमाच्या ह्या राख्या प्रतीक आहेत. इतक्या बहिणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे, अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही. लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणारेच सर्वात मोठे चोर आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे, कालीदास कोळंबकर, अमित साटम, संजय उपाध्याय, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुलभा गायकवाड, विक्रांत पाटील, संजय केनेकर, माधवी नाईक आदी उपस्थित होते.




