घोटी । जाकीर शेख Ghoti
इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळ शिवारात अवैध जिलेटीनचा साठा जप्त करून संबधित आरोपींना अटक करीत पोलीस पथकाने कारवाई केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन व गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध होण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ गावाच्या शिवारात काही ठिकाणी घरामध्ये तसेच पत्र्याचे शेडमध्ये अवैधरित्या जिलेटीन सारख्या स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मिळाली होती.
त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सपोनि दिनकर मुंडे यांचे पथकाने लागलीच नाशिक ग्रामीण श्वान पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथक यांचेसह सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला. सदर सारूळ गावचे शिवारात संशयीतांचे राहते घराचे पाठीमागील बाजूस तसेच पत्र्याचे शेडमध्ये अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीन सारखे स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रित रित्या निष्काळजीपणे मिळुन आले.
या कारवाईत १) गोरख बाजीराव ढगे, वय ३४, रा. सारूळ, ता. जि. नाशिक २) विकास नवले, रा. सारूळ, ता. जि. नाशिक ३) ओंकार कैलास नवले, वय २३, रा. सारूळ, ता. जि. नाशिक ४) दिपक दशरथ क्षिरसागर, वय ३२, रा. शिंगवे बाहुला, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक ५) गौरव मोहन नवले, वय ३२, रा. सारूळ, ता. जि. नाशिक ६) अमित अजमेरा, (पुर्ण नाव माहित नाही) ७) कोठावदे (पुर्ण नाव माहित नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
यातील वरील आरोपी क्र. १ ते ५ यांना जिलेटीन सारख्या स्फोटक पदार्थांच्या कांड्या भरलेले बॉक्स यांच्या संपर्कात डेटोनेटर आल्यास भयंकर विस्फोट होऊन इतरांचे जिवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल किंवा कोणत्याही व्यक्तीस दुखातप किंवा क्षति पोहचु शकते हे माहित असतांना देखील अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या मिळून आल्या. स्फोटके घरात व शेडमध्ये ठेवण्याचा त्यांचेकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे माहित असतांना देखली त्यांनी अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या कांडया भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर तसेच डी. एफ. वायर असे एकत्रितरित्या निष्काळजीपणाने कब्जात बाळगतांना मिळुन आले.
यातील आरोपी क्र. ६ व ७ यांना सदरचा मुद्देमाल सुरक्षितरित्या हाताळणा-या प्रशिक्षित इसमाने काम झाले नंतर उर्वरित स्फोटके हे मॅग्झिनमध्ये सुरक्षितरित्या ठेवणे बंधनकारक असते हे माहित असतांना देखील आरोपी क्र. १ ते ५ यांच्या ताब्यात असुरक्षितरित्या ठेवला म्हणुन सदर आरोपीतांविरूध्द वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८४, २८८ सह भारतीय स्फोटक कायदा १८८४ चे कलम ५ चे उल्लंघन ९ ब (१) (ब), ९ ब (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत जिलेटीनच्या कांड्या भरलेले ४९ बॉक्स त्यात एकुण ६, १२५ जिलेटीनच्या कांड्या, २२०० इलेक्ट्रीक डेटोनेटर, १५० मीटर डी. एफ. वायर असा एकुण ९५,७५०/- रू. किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे पथक करीत आहे. ही कारवाई ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सपोनि दिनकर मुंडे, पोउनि अमोल सुर्यवंशी नाशिक तालुका पो.स्टे., पोउनि एकनाथ भोईर वाडीव-हे पो.स्टे., पोउनि सुनिल शिंदे, पोलीस अंमलदार सुभाष धुळे, रावसाहेब शिंदे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळ, सचिन कदम, तुषार कापडणीस, रविराज जगताप यांचे पथकाने केली आहे.




