Sunday, May 19, 2024
Homeजळगावलतादीदी अन् खान्देशचे भावनिक नाते

लतादीदी अन् खान्देशचे भावनिक नाते

अखेर एका ‘स्वर’ युगाचा आज अस्त झाला. धुळे-थाळनेर या गावांचा भावपूर्ण संबंध मंगेशकर परिवाराचा राहिला आहे. एक जुनी आठवण आहे. त्यावेळी लतादीदी आठ वर्षाच्या होत्या. मास्टर दिनानाथ मंगेशकर दिवाळीच्या पर्वात धुळे येथे विजयानंद थियटरला (आताची स्वस्तीक टॉकीज) पृथ्वी थियटरचे पगला घोडा नाटक सादर करण्यास आले होते. सोबत माई मंगेशकर आणि लतादीदी होत्या. दिनानाथांनी धुळ्याच्या गायिका नाजुबाई यांना बहीण मानले होते. म्हणूनच भाऊबिजेची भेट व्हावी म्हणून ते नाटकाच्या निमित्ताने आले होते.

त्या दिवशी ‘पगला घोडा’ नाटकाचा पहिला अंक चालु असतांनाच स्टेजच्या पडद्यांना शॉटसर्किटमुळे आग लागली. सर्व नाटकाचे साहित्य जळाले. कलावंतांचे पोषाखही जळालेत. त्यामध्ये आठ वर्षाच्या लतादीदींचे ड्रेसही जळालेत. तेव्हा गल्ली नंबर पाच मधील निर्मला चंदनकर (दिलीप लगडेंची आई) यांचे कपडे दीदींनी वापरलेत. ही आठवण मी 40 वर्षापूर्वी दीदींना फोनवर सांगितली. त्यांनी भरभरून दाद दिली.

दुसरी आठवण त्याचवेळी दीदींना, बालमुकुंद शर्मा यांच्या फोनवरून सांगितली, दीदी, आम्ही तुमच्या वयाच्या एकसष्टीचा सोहळा तुमच्या आजोळ गावी थाळनेरला रमेश निकम यांच्या स्वरयात्रा वाद्यवृंदाद्वारे साजरा केला. रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत चार तास फक्त तुमची गाणी आम्ही हजारो थाळनेरवासियांना ऐकवलीत. ___सतारीच्या तारा छेडल्या जाव्यात अशा आवाजाचा आनंद देत दीदी म्हणाल्या, किती किती आणि कसे-कसे विलक्षण प्रेम करतात रसिक माझ्या स्वरांवर, ही तर आई-वडील आणि मंगेशाची कृपा. ___दीदींची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग जयप्रकाश जातेगांवकर यांच्यामुळे नाशिकला आला. तो सोहळा दिनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या सोहळ्याचा होता. प्रथम महापौर भगवानबापूजी करनकाळ यांच्यासोबत दीदींचा धुळेकरांतर्फे सत्कार केला. त्यांना धुळे येथे येण्याचे आमंत्रणही दिले. त्यावेळी आशा भोसले, अभिनेत्री रेखाही होत्या.

- Advertisement -

धुळेकरांना अभिमान वाटावा असा सोहळा मुंबईच्या षणमुखानंद हॉलला ‘दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा’ माजी मंत्री रोहिदास पाटील, कुणाल पाटील यांनी जवाहर ग्रुपतर्फे प्रायोजित केला. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांना देण्यात आला होता. त्या सोहळ्यात मी, मंगेशकर परिवारावर लिहिलेली अहीराणी भाषेतील कविता भारतरत्न लतादीदींना दिली. त्यांनी ती कविता पूर्ण वाचली आणि दीदी म्हणाल्या, मला अहिराणी भाषा खूप आवडते, आजोळच्या गाणीत आम्ही बहीणींनी अहिराणीचा गोडवा जपला आहे. मला अभिमान वाटला. मायबोली अहिराणीवर प्रेम करणार्‍या स्वसम्राज्ञी लतादीदी मंगेशकरांचा. दीदींमुळेच पद्मश्री ना.धों. महानोर यांची ‘जैत रे जीत’ मधील गाणी अजरामर झालीत. ज्यांचे संगीत स्वत: दीदींनी ‘आनंदघन’ नावाने दिले होते._ पद्मश्री पु. ल. देशपांडे दीदींविषयी एकच वाक्य बोलल्याचे आठवते, जगात काय चिरंतन आहे? असे जर मला कुणी विचारले तर, मी सांगेन, विश्वात चंद्र, सूर्य नंतर फक्त लतादीदींचे स्वर आहेत.

– जगदीश देवपूरकर, धुळे

(मो. 9822852983)

- Advertisment -

ताज्या बातम्या