Friday, May 3, 2024
Homeनगर12 वीची पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार

12 वीची पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार

संगमनेर (वार्ताहर)- राज्यात यावर्षी 12 वीची पुस्तके बदलत असून ती पुस्तके सध्याच्या लॉकडाऊनमुळे बाजारात उपलब्ध करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत अकरावीतून बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी व शाळांना पुढील दृष्टीने तयारी करण्यासाठी सदरची पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावर विचार सुरू आहे. लवकरच विद्यार्थ्यांना सदरची पुस्तके उपलब्ध होतील असे समजते.

यासंदर्भात सोमवारी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण विभागाच्या अपर सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक दिनकर पाटील, माहिती तंत्र विभागाचे प्रमुख विकास गरड यांनी झूम बैठकीद्वारे संवाद साधला.

- Advertisement -

यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याची पुस्तके देखील बालभारतीने छापलेली आहेत. परंतु सध्या ‘लॉकडाऊन’ असल्याने ही पुस्तके बाजारात उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत. त्यात बाजारात खाजगी विद्यार्थ्यांची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार कशी, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात शिकविण्याचे नियोजन करता येत नसल्याचे शाळांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे.

त्यामुळे विद्यार्थी सक्तीने घरात बसून आहेत. अकरावीतून बारावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांना या काळात बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन धडे देण्याचे नियोजन राज्यातील काही शाळांनी केले आहे. मात्र, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच बाजारात उपलब्ध नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकत नाही. पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्याच्या पीडीएफ तरी बालभारतीने त्यांच्या संकेतस्थळावर द्याव्यात, अशी मागणीही शाळांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, बदललेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने इयत्ता बारावीची सर्व विषयाची पुस्तके छापून झालेली आहेत. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ही पुस्तके शाळा वा दुकानांमध्ये पाठविता येत नाहीत. ही पुस्तके शाळांपर्यंत कशी पोचवायची याबद्दल विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यात बारावीच्या बदललेल्या पुस्तकांचे पीडीएफ संकेतस्थळावर देण्याविषयी चर्चा झाली आहे. लवकरच त्याची कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधीचा घेतला आढावा
राज्यात लॉकडाऊनमुळे प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी घरी आहेत. विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये घरी बसून अभ्यास करता यावा यासाठी शिक्षक वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत. समाज माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात विद्यार्थ्यांना समाज माध्यमाद्वारे अभ्यासाची प्रक्रिया केल्याचा फायदा झाला याची माहिती घेण्यात आली.

आकाशवाणी, दूरदर्शनद्वारे विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी
राज्यात विद्यार्थ्यांना सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता यावा या दृष्टीने राज्य स्तरावर विविध स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी, विविध स्वरूपाचे कॅप यांचा उपयोग करता येईल का ? या दृष्टीने राज्य स्तरावरती विचार सुरू असल्याचे समजते.या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिकणे करण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने येत्या काही कालावधीत दूरदर्शन आकाशवाणी विद्यार्थ्यांची शिकणे सुरू होईल असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या