Monday, May 6, 2024
Homeनगरअकोलेच्या कन्येने शोधली करोनाची निदान करणारी चाचणी

अकोलेच्या कन्येने शोधली करोनाची निदान करणारी चाचणी

अकोले (प्रतिनिधी)- जगभर करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कहर केला आहे.अवघे जग चिंताक्रांत झाले आहे. अनेक प्रगत राष्ट्र त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेची कन्या शीतल रंधे -महाळुंकर या युवा वैज्ञानिक तरूणीने चाचणी किटची निर्मिती केली असून त्याला शासनाने मान्यता दिली आहे.

शीतल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे माहेर आहे. त्यांचे शिक्षण एम.एस्सी बायोटेक झाले आहे. त्या कुसगाव (पुणे) येथील इम्नोफ सायन्स या कंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या विभागाची जबाबदारी पाहात आहेत. या कंपनीने डेंग्यु, एचआयव्ही, एचसीव्ही, गरोदरपणा याचे निदान करणार्‍या चाचण्या किट विकसित केल्या आहेत. कोरोना महामारीच्या संकटात विषाणू प्रादुर्भाव ओळखण्याची चाचणी तयार करण्याची भूमिका घेण्यात आली.

- Advertisement -

त्या भूमिकेच्या सोबत कंपनीतील शीतल रंधे-महाळुंकर यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे, अविनाश तुळसकर, अमृत कोरे, वर्षा गुंजाळ, अवधुत सातपुते, ललित बारावकर, हनुमंत गोयकर यांनी एकत्रित येऊन संशोधनाच्या कामास सुरुवात केली. चाचणी किट बनवण्यासाठी परवानगी मिळवली आवश्यक असल्याने त्यासाठीचा प्रस्ताव करून त्यास परवानगी मिळविण्यात आली. त्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करण्यात आला.

लॉकडाऊनमुळे हे साहित्य मिळण्यास विलंब झाला. तरीही अधिक वेळ कष्ट करत अल्पावधीत चाचणी किट विकसीत करण्यात आली आहे. किट पुण्यातील आयसीएमआर/ एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यांना दोन दिवसांत एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल ऑरगनायझेशन कडून तपासणी अहवाल आल्यानंतर करोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. 15 मिनिटांत करोना विषाणू प्रादुर्भाव झाला किंवा नाही याचे निदान या चाचणी किटमुळे होणार आहे. हे किट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.

शीतल यांना संशोधन क्षेत्रात आवड होती. गेल्या चार वर्षांपासून कंपनीत संशोधन विभाग सांभाळत असून त्यांचे काका अतुल तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. कोरोना महामारी संकटाच्या काळात आपल्या देशासाठी संशोधन कार्य करण्यात सहभाग नोंदवण्याचे भाग्य मिळाले याचे अधिक समाधान असल्याचे शीतल यांनी सांगितले.

शिक्षक कन्येचा अकोलेकरांना अभिमान
अकोले तालुक्यातील तालुका एज्युकेशन संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात शीतल यांचे वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कन्येने देशावर संकट अधिक घोंगावत असताना स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर ती अवघ्या पंधरा मिनिटात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला किंवा नाही याची तपासणी करणारी चाचणी विकसित करून देशासाठी मोठे योगदान दिले आहे. याचा आपल्याला अभिमान असल्याची भावना तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या