Monday, May 6, 2024
Homeनगरखबरदार ! महापालिकेची टिल्लू मोटार जप्तीची मोहीम

खबरदार ! महापालिकेची टिल्लू मोटार जप्तीची मोहीम

 दोन वेळेस दंड, तिसर्‍यांदा कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- नळाला थेट मोटारी बसवून पिण्याचे पाणी उपसा करणार्‍यांविरोधात महापालिकेने मोटार जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या वेळीस हजार, दुसर्‍या वेळेस दोन हजार अन् तिसर्‍या वेळेस मोटार लावून पाणी उपसा करणार्‍यांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

- Advertisement -

मुळा धरणातून उपसा होणारे पाणी वसंत टेकडी येथील टाकीत साठविले जाते. तेथून ते शहराला वितरीत होते. तेथे होणारी पाण्याची उपब्धता पाहता प्रत्येकाला पाणी मिळावे याचे नियोजन महापालिका करते. मात्र काही लोक नळाला थेट मोटारी लावतात. काहींच्या नळाला तोट्याच नाही. त्यामुळे अनेकांना पाणी मिळत नाही, अशा तक्रारी महापालिकेकडे गेल्या होत्या. तोट्या नसल्याने पाण्यची नासाडी होते.

तर दुसरीकडे अनेकांना पाणी मिळत नाही. त्यावर महापालिकेने आता उपाय शोधला आहे. प्रत्येक नळधारकास नळाला तोटी बसविण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. उन्हाळ्याचे दिवस, पाण्याची वाढती मागणी व टंचाई पाहता महापालिकेने नळाला मोटारी लावून पाणी उपसा बंद करण्याचे फर्मान सोडले आहे.

महापालिकेचे पथक शहरभर फिरत त्याची अंमलबजावणी होते की नाही याची खातरजमा करणार आहेत. नळाला मोटार लावून पाणी उपसा केला जात असल्याचे दिसले तर मोटार जप्त केली जाणार आहे. एक हजार रूपये दंड आकारून ही मोटार परत केली जाईल. दुसर्‍या वेळेस मोटारीचा पाणी उपसा पकडला तर जप्त केलेली मोटार सोडविण्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारला जाईल. तिसर्‍या वेळेस मोटारीने पाणी उपसा करताना पकडले गेला तर मात्र थेट नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे.

मोटारी लावल्याने अनेकांना पाणी मिळत नाही. प्रत्येकाला पाणी मिळावे याचे नियोजन केले आहे. त्यासाठीच महापालिकेने मोटार जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने तसेच नियमाला धरूनच पाणी उपसा करावा. अन्यथा कारवाई अटळ आहे.
– महादेव काकडे, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या