अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा न्यायालयात एकाने वकिलास मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास वकिलांच्या कक्ष बार रूममध्ये घडली. या घटनेमुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. मारहाणीच्या परस्परविरोधी फिर्यादी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहे. मारहाण करणारा लवसागर कर्तारसिंग चावला (रा. सावेडी) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेले वकील अॅड. अख्तार अजीस सयद (वय-43 रा. गोंविदपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. तर, लवसागर कर्तारसिंग चावला याने दिलेल्या फिर्यादीवरून अॅड. अख्तार अजीस सयद विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा न्यायालयातील वकील कक्ष बार रूम एक मध्ये चावला अॅड. सयद यांच्या टेबलवर बसलेला होता. यावेळी तेथे आलेले अॅड. सयद चावलाला म्हणाले, तू टेबलवरून ऊठ मला काम करायचे आहे. याचा राग चावलाला आला. अॅड. सयद यांना उद्देशून चावला याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. जवळ असलेली खुर्ची चावला याने उचलून अॅड. सयद यांच्या दिशेने फेकली ती सयद यांनी हुकविण्याचा प्रयत्न केला.
परंतु, सयद यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला खुर्चीचा मार लागला. चावला याने दुसरी खुर्ची सयद यांना मारण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित वकिलांनी ती पकडली. या घटनेमुळे न्यायालयात एकच गोंधळ निर्माण झाला होता. उपस्थित वकिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून आरोपी चावला विरोधात फिर्याद दिली. अॅड. सयद यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान, लवसागर कर्तारसिंग चावला याने अॅड. सयद यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा न्यायालयातील वकील रूममध्ये अॅड. सुपेकर यांच्या टेबल जवळील खुर्चीवर बसलो होतो. यावेळी सयद तेथे आले व खुर्चीवरून उठण्यास सांगितले. यावर चावला यांनी सयद यांना मी नेहमीच येथे बसतो असे म्हटले. यावर सयद यांना राग आल्याने चावला यांना शिवीगाळ करून खुर्ची डोक्यात घालून जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. भिंगार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून पुढील तपास पोलीस हवालदार एम. आय. शेख करीत आहेत.