भिंगारमध्ये प्रभागनिहाय नागरिकांशी संवाद : वरिष्ठ लष्करी अधिकार्यांशीही चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगार छावणी परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दिवसभर भिंगार येथे प्रभागनिहाय नागरिकांशी चर्चा करत अडचणी समजून घेतल्या. तसेच छावणी मंडळाच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्यांशीही त्यांनी चर्चा केली.
छावणी परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. या निवडणुकीत आता शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होईल की नाही, याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र आघाडी करण्याच्या मानसिकतेत आहे. राष्ट्रवादीनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. खा. डॉ. विखे यांनी यापूर्वीच ही निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. त्या दृष्टीने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून भिंगार शहरावर लक्ष केंद्रित केले आहे.
बुधवारी दि. 8 रोजी त्यांनी भिंगार येथे पूर्ण दिवस दिला. प्रभागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधत तेथील समस्यांची माहिती जाऊन घेतली. छावणी परिषदेच्या कार्यक्षेत्रातील समस्या या बहुतांश केंद्र सरकारशी निगडित असल्याने भिंगारचे प्रश्न त्यांनी केंद्र सरकारकडे उपस्थित करून ते सोडविण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार डॉ. विखे यांचा भिंगार दौरा राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
केवळ नागरिकांशीच नव्हे, तर त्यांनी प्रश्नांसदर्भात छावणी परिषदेच्या वरिष्ठ लषष्करी अधिकार्यांशीही संवाद साधला. त्यांच्यासमवेत कण्टोन्मेण्टच्या पाणीप्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी कण्टोन्मेण्टला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी एमआयडीसी ते एमईएसच्या मुख्य जलवाहिनी मधून टॅब टाकून देण्याची मागणी केली.
ही मागणी वरिष्ठांकडे पाठवून देऊ असे कण्टोन्मेण्ट बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडिअर व्ही.एस. राणा यांनी सांगितले. या बैठकीस कमाडंट ओ. पी. शर्मा, कण्टोन्मेण्ट सीईओ विद्याधर पवार, एमईएसचे गॅरिसन इंजिनिअर पारस मेस्त्री, विपिनकुमार सिंग, एमआयडीसीचे उपअभियंता एन. जी. राठोड, कण्टोन्मेण्ट बोर्ड सदस्य प्रकाश फुलारी, रवींद्र लालबोंद्रे, संजय छजलानी, शुभांगी साठे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, भाजपचे महेश नामदे, शिवाजी दहीहंडे, बाळासाहेब पतके आदी उपस्थित होते.
जास्तीचे पाणी मुरते कुठे ?
बैठकीत एमआयडीसी, एमईएस कॅण्टोन्मेण्टच्या अधिकार्यांनी अडचणी मांडल्या. यावर पाणी प्रश्नासंदर्भात पुन्हा आठ दिवसांनी बैठक घेण्याचे ठरले. कॅण्टोन्मेण्ट म्हणते पाणी कमी मिळते. एमईएस म्हणते आम्हाला पाणी जेवढे मिळते तेच आम्हाला कमी पडते, तरीही आम्ही कॅण्टोन्मेण्टला पाणी देतो. एमआयडीसी म्हणते आम्ही तर भरपूर पाणी देतो. त्यामुळे जास्तीचे पाणी मुरते कुठे, असा मुद्दा खासदार डॉ. विखे यांनी उपस्थित केला.