Thursday, May 2, 2024
Homeनगरकंटेनरमधून प्रवास करणार्‍या 82 मजूरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कंटेनरमधून प्रवास करणार्‍या 82 मजूरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नगरमध्ये कोतवाली पोलिसांनी अडविले; वाहन चालकावर गुन्हा  
अहमदनगर (प्रतिनिधी)–  प्रतिबंधात्मक आदेश डावलून कंटेनरमधून प्रवास करणार्‍या 82 मजूरांना कोतवाली पोलिसांनी गुरुवारी दुपारी केडगाव बायपास येथून ताब्यात घेतले आहे. या सर्वांना गिते पाटील व सिद्ध लॉन्स येथे ठेवण्यात आले आहे. या सर्वांची आज तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या कंटेनर चालकास अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सिंग ठाकूर (रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलीस हवालदार भास्कर मिसाळ यांनी फिर्याद दिली.
कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही गुरुवारी पुणे येथून येणार्‍या एका कंटेनर चालकाने पुणे-नगर रोडने पायी जाणार्‍या 82 मजूरांना दाटीवाटीने कंटनेरमध्ये भरले. हे सर्व मजूर बुलढाणा जिल्ह्यातील तर काही मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश राज्यातील आहे. ते सर्व जण रोडने पायी आपआपल्या गावी चालले होते. त्यांना कंटेनर चालकाने दाटीवाटीने बसविले होते.
दुपारी केडगाव बायपास येथे कंटेनर आल्यावर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या हा प्रकार लक्षात आला. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांना याबाबत कल्पना देण्यात आली. तहसीलदार पाटील यांनी सर्व मजुरांना गिते पाटील व सिद्ध लॉन्स येथे ठेवले आहे. सर्वांची आज वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कंटेनर चालक ठाकूर विरोधात भादंवि कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी ठाकूरला अटक केली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या