Friday, May 3, 2024
Homeनगरकरोना रूग्ण आढळल्याने मोहोज देवढे परिसर सील

करोना रूग्ण आढळल्याने मोहोज देवढे परिसर सील

पाथर्डी तालुक्यात सापडला पहिला रूग्ण : पोलीस, प्रशासन सज्ज

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील मोहोज देवढे येथील एका 45 वर्षीय शेतकरी व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुका प्रशासनाकडून उद्या (रविवारी) पूर्ण दिवस जीवनावश्यकसह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पाथर्डी तालुक्यात पहिला रूग्ण सापडल्याने संपुर्ण तालुक्यातच घबराट पसरली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, की दहा ते बारा दिवसांपूर्वी संबंधित रुग्ण वाशी (मुंबई) मार्केट येथे शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेला होता. तेथे तो कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आला असण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी त्याला सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यामुळे तो प्रथम पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. करोनाची लक्षणे प्रभावीपणे जाणवल्याने त्याला पुढील तपासणीसाठी अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्त्राव पुणे येथील लष्करी वैद्यकीय शाळेत पाठविले होते.

त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली. विशेष म्हणजे तो आपल्याा दुचाकीवरून परिसरात शेवग्याच्या शेंगा विक्री करत असे. ही बातमी तालुक्यात कळताच खळबळ उडाली.

सायंकाळी तालुका प्रशासन सतर्क झाले. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार नामदेव पाटील, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. दराडे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, अरोग्य, महसुल, पोलिस विभागाचे कर्मचारी तातडीने मोहोज देवढे गावात मोठ्या ताफ्यासह दाखल झाले.

संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या, त्याच्या शेजारी असलेल्या तसेच शेतात कामावर असलेल्या सुमारे तीस संशयित व्यक्तीना तपासणीसाठी ताब्यात घेतले असून आणखी किमान पंधरा ते वीस व्यक्तीची माहिती घेऊन त्यांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत चालू होते.

परिसरातील गावे बंद
मोहज देवढे येथे करोनाचा रूग्ण सापडताच परिसरातील सर्व गावे तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी दिल्या आहेत. मोहोज देवढेच्या शेजारी असणार्‍या ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी संपर्क साधला. तसेच कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या