मनोरुग्ण वृत्तीतून घडला प्रकार; श्रीरामपूर पोलिसांनी केला सखोल तपास
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातून खासगी क्लासला चाललेल्या मुलाचे अपहरण करण्याचे प्रकरण हे अपहरण नसून हा प्रकार मनोरुग्ण वृत्तीतून घडल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्याने अखेर या प्रकरणावर पडदा पडला.
शहरातील वरुण विशाल फोपळे (वय 17) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. त्याने खासगी शिकवणी लावली आहे. तो शिकवणीसाठी दि. 24 डिसेंबर रोजी अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी 5 वाजता गेला असता एका मोटारीतून तिघेजण त्याठिकाणी आले.
त्यातील एकाने वरुण यास तुझा मी मामा आहे. तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे, असे सांगून आपले नाव निलेश फिरोदिया सांगितले व वरुणचा हात धरला. मात्र फिरोदिया नावाचा आपला कुणी मामा नाही म्हणून वरुणने घरी फोन लावला. त्यामुळे घाबरून जाऊन तवेरा गाडीतील लोक पळून गेले, अशी फिर्याद वरुणच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात नोंदविली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तवेरा गाडीचा नंबर मिळविला व फोपळे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इतर माहिती मिळविली. त्यातून या प्रकरणातील लोक हे पाथर्डी तालुक्यातील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना श्रीरामपूरला बोलावून घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
त्या दिवशी तवेरा गाडीत निलेश फिरोदिया याच्यासह त्याची आई, वडिल, बहिण सर्वच होते. निलेश याच्यावर श्रीरामपुरातील मनोरुग्ण तज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी ते उपचारासाठी डॉक्टरांकडे आले होते. उपचार सुरू असल्याने अधूनमधून त्याला झटके येतात. घटनेच्या दिवशी जेव्हा रस्त्यात गाडी थांबली तेव्हा त्याला वरुण फोफळे दिसला.
वरुण हा निलेशच्या आत्याच्या मुलासारखा दिसत असल्याचे निलेशला वाटले. त्यामुळे त्याने वरुणचा हात धरला आणि त्याच्याशी मारवाडी भाषेत संवाद साधला. मात्र अनोळखी व्यक्तीने हात धरल्याने वरुण घाबरला व त्याने घरी फोन लावला. मात्र त्यानंतर कटकट नको म्हणून निलेशच्या कुटुंंबियांनीही निलेशला धरून गाडीत बसविले आणि ते तेथून निघून गेले. मात्र अपहरणकर्त्याची चर्चा शहरभर पसरली.
दरम्यान, काल निलेश व वरुण फोपळे या दोघांच्याही कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेऊन समोरासमोर चर्चा झाली. त्यावेळी हा प्रकार अपहरणाचा नसून मनोरुग्ण वृत्तीतून घडल्याचे समोर आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली.