Friday, May 3, 2024
Homeनगरघरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद

घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- घरफोड्या, चोर्‍या करणार्‍या तिघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. समीर खव्जा शेख (वय- 22 रा. सबजेल चौक, नगर), परवेज मेहमूद सय्यद (वय- 19 रा. भोसले आखाडा, नगर), गणेश ऊर्फ गौतम संजय भंडारी (वय- 20 रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, एक दुचाकी असा 55 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि. 10) रात्री सलीम अलीम अन्सारी (रा. सारसनगर) यांचे सारसनगर रोडवरील सौरभ बेकर्स पॉईंट हे दुकान फोडून चोरट्यांनी तीन मोबाईल, रोख रक्कम असा 55 हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी अन्सारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना सदरचा गुन्हा समीर शेख याने इतरांच्या मदतीने केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.

निरीक्षक पवार यांनी याबाबत सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, विजय वेठेकर, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, सागर सुलाने यांच्या पथकाला आरोपींना अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकाने प्रथम समीर शेख याला अटक केली. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता परवेज सय्यद व गणेश भंडारी यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली समीर शेख याने पोलिसांना दिली. पोलिसांनी सय्यद व भंडारी यांना अटक केली. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दोघे सराईत गुन्हेगार
अटक केलेल्या तिघांपैकी समीर खोजा शेख व गणेश उर्फ गौतम संजय भंडारी हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. समीर शेख विरोधात घरफोडी, चोरी, दरोडा, आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक तर, कोतवाली पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. गौतम भंडारी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या