Friday, May 3, 2024
Homeनगरदेशी दारुला मागणी वाढली चढ्या भावाने विक्री

देशी दारुला मागणी वाढली चढ्या भावाने विक्री

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे संगमनेर शहर व तालुक्यात देशी दारुला चांगलीच मागणी वाढली आहे. विक्रेत्यांनी चढ्या भावाने देशी दारू विकण्यास सुरुवात केलेली असतानाही मद्यपी आनंदाने वाढीव किंमत देवून ही दारू घेत आहे. बंदी असतानाही दारुची मोठ्या प्रमाणात विक्री करुन विक्रेते मालामाल होत असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे तालुक्यातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. दारूच्या दुकानांनाही लॉकडाऊन आहे. मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी खुलेआम देशी-विदेशी दारू मिळत आहे. महामार्गावरील हॉटेल, बार मध्ये छुप्या पद्धतीने ही दारू विक्री केली जात आहे. लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरु झाल्यामुळे विदेशी दारु विक्रीवर मर्यादा आल्या आहेत. अनेक मद्यपींना विदेशी दारुची टंचाई भासू लागली आहे. यामुळे ते देशी दारुकडे वळाले आहेत. यामुळे देशी दारुची मागणी अचानक वाढली आहे. याचा गैरफायदा देशी दारु विक्रेत्यांनी घेतला असून त्यांनी दुप्पट दराने या दारूची विक्री सुरू केली आहे.

- Advertisement -

तालुक्यात अनेक गावात देशी दारू सहज मिळत आहे. समनापूर, कोल्हेवाडी, जोर्वे आदी गावात मोठ्या प्रमाणावर ही दारू विकली जात आहे. काही परप्रांतीय युवक शहरातून ग्रामीण भागात ही दारू पुरवत आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या दारूची खुलेआम विक्री करत आहे. दारूच्या दुकानांतील साठा संबंधित आधिकारी तपासतात मात्र या साठ्यातुनही दारुची विक्री होत आहे.

काही दुकानात मोजून ठेवलेल्या स्टॉकही गायब झाल्याचे बोलले जात आहे. काही दुकानदारांनी सी.सी.टी.व्ही.चे फुटेजही डिलीट केल्याची चर्चा आहे. तालुक्यात खुलेआम देशी दारू विकली जात असताना स्थानिक अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. या अधिकार्‍यांशी अनेकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींना दाद देत नसल्याचे चित्र असून अवैध दारू विक्री बाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.

स्थानिक अधिकारी दाद देत नसल्याने काही नागरिकांनी थेट दारू उत्पादनच्या जिल्हा अधिक्षकांकडेही तक्रारी केल्या आहेत. तक्रारी होऊनही अवैद्य दारू विक्री चालूच असल्याने या विक्रेत्यांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा सवाल विचारला जात आहे.

बॉक्सची किंमत वाढली
मद्यपींचा कल देशी दारूकडे वाढत चालल्याने देशी दारूची किंमतही वाढली आहे. विक्रेते चढ्या भावाने ही दारू विक्री करीत आहे. एरव्ही 60 रुपयांना मिळणारी बाटली आता 100 ते 150 रुपयांना मिळत आहे. संजीवनीच्या दारूच्या बॉक्सची किंमत 2200 रुपये असताना तब्बल 4 हजार रुपयांना विकला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या