Tuesday, May 7, 2024
Homeनगरजिल्ह्यात सतराशे लोकांवर गुन्हे दाखल

जिल्ह्यात सतराशे लोकांवर गुन्हे दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचा फैलाव होऊ नये, संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागातही लॉकडाउनची घोषणा केली आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून लोकांनी घरात थांबावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

परंतु, कोरोनाचा धोका लोकांनी गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. गेल्या बारा दिवसात शासकीय आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या सुमारे सतराशे जणांविरुद्ध पोलिसांनी कलम 188 अन्वये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रथम जनता कर्फ्यू व नंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात कलम 144 लागू करून जमावबंदी व संचारबंदी लागू केली. लॉकडाऊन काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाई करत आहे.

मात्र, गेल्या बारा दिवसांमध्ये अनेकांनी शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. भाजी, किराणा माल, मेडिकल खरेदीसाठी लोक वारंवार बाहेर पडत आहे. यासाठी नवनवीन युक्ती करताना दिसत आहेत. बोगस स्टिकर, खिशात मेडिकल, किराणा खरेदीची चिठ्ठी ठेऊन लोक बाहेर पडत आहे. विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.

लोक ऐकणार कधी ?
विनाकारण बाहेर पडू नका, कोरोना व्हायरसचा धोका गांभीर्याने घ्या. असे आहवान प्रशासन वेळोवळी करत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 21 रुग्ण आढळून आले. दोघांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पोलीस आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र रस्त्यावर आहेत. लोकांवर गुन्हे दाखल केले तरी लोक ऐकत नाही. घराबाहेर पडणे लोकांनी थांबवले नाही, प्रशासनाने वारंवार सांगून ऐकलं नाही तर जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

नगर शहरात बाराशे
जिल्ह्यातील अनेक शहरात आदेशांचे उल्लंघन केल्यानंतर गुन्हे दाखल केले आहे. यात सर्वाधिक नगर शहरातील बाराशे व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोतवाली, भिंगार, तोफखाना पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या