विजेच्या लपंडावाने रब्बी हंगामही धोक्यात; शेतीसाठी पूर्णदाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी
टाकळीभान (वार्ताहर) – खरीप हंगामा पाठोपाठ रब्बी हंगामही महावितरणकडून केल्या जाणार्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे संकटात सापडला आहे. विहिरीत पाणी असूनही विजेच्या लपंडावाने पिकांना ते देता येत नसल्याने नैसर्गिक आपत्तीनंतर महावितरण निर्मित आपत्ती शेतकर्यांवर ओढवली असल्याने शेतकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सिलसिला सुरू आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेतीपिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ हंगामात पाणी पातळी घटल्याने पिके जळून गेली होती. त्यानंतर गेल्या खरीप हंगामात पिके काढणीस आली आसतानाच अतिवृष्टीने ती वाहून गेली. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर रब्बी हंगाम उभा करण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागली. रब्बी पिकांची कशीबशी लागवड केली मात्र ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करीत कशबशी पिके जगविण्याचा अटापिटा सध्या सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
मोठ्या प्रयत्नाने वातावरणावर मात करीत शेतकरी पिकांचे स्वास्थ्य टिकविण्याचा प्रयत्न करीत असले तरी महावितरणच्या लहरी वीज पुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. शेतीसाठी दिला जाणारा वीजपुरवठा तीन टप्प्यांत असला तरी दोन टप्पे ऐन थंडीच्या वेळेतच आहेत. एक टप्पा दिवसाचा असला तरी वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने पिकांचे भरणे होत नाही. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना बसत आहे.
टाकळीभान परिसराला वीज पुरवठा होणार्या गणेशखिंड आणि भोकर उपकेंद्रातून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. हीच परीस्थिती तालुक्यातील इतर उपकेंद्रांची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आधीच सलग दोन हंगाम अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्यांचा जादा अंत न पाहता शेतीसाठी पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
शेतीसाठी यंदा मुबलक पाणी आहे. गेल्या दोन हंगामांत शेतकर्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. चांगले पाणी उपलब्ध झाल्याने या रब्बी हंगामात गेल्या दोन हंगामांत झालेल्या नुकसानीची कसर भरुन काढता येईल आशी शेतकर्यांची अपेक्षा होती. मात्र विजेचे भारनियमन व सातत्याने शेतीसाठी मिळणार्या वेळेतील विजेचा लपंडाव यामुळे शेती पिकांचे भरणेच होत नसल्याने पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करून शेतकर्यांना आधार द्यावा.
-राजेंद्र कोकणे (माजी उपसरपंच, टाकळीभान)