Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political: अजितदादांच्या रेकॉर्डब्रेक सभेने वातावरण फिरले

Nashik Political: अजितदादांच्या रेकॉर्डब्रेक सभेने वातावरण फिरले

आदिवासी बिचारे म्हणून झिरवाळांना ठोकता का? अजितदादांचा शरद पवारांना प्रश्न

- Advertisement -

वणी । वार्ताहर Vani

इतरांना सोडायचे, आदिवासी म्हणून झिरवाळ यांना ठोकायचे हा कुठला न्याय? असा खणखणीत प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शरद पवार यांना विचारला असून, आदिवासी म्हणून झिरवाळांना पर्यायाने जनतेला न हिणवण्याचा सल्ला अजितदादा पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता महाविकास आघाडीला दिला. अजितदादा पवार यांच्या सभेमुळे विरोधकांची दांडी गुल झाली असून सभेला झालेली गर्दी पाहता आतापर्यंतच्या सर्वांच्या सभांचा विक्रम ना. नरहरी झिरवाळ यांनी मोडला. अजितदादांच्या सभेनंतर मतदारसंघातील वातावरण फिरले असून, ना. झिरवाळ यांच्या विजयावर वणीच्या सभेने शिक्कामोर्तब झाले आहे. बहुजनांची मने अजितदादा पवार यांनी जिंकल्याने ना. झिरवाळ यांच्या विजयाच्या मार्गावरील अडथळे दूर झाल्याचे मानले जात आहे. शरद पवार यांच्या सभेचा प्रभाव अजितदादा पवार यांच्या सभेमुळे पुसला गेला असून जनता पुन्हा ‘रामकृष्ण हरी, बरा आहे आपलाच नरहरी’ असा नारा सभेनंतर देत होते.

अजितदादा पवार यांनी आपल्या खास शैलीत विकासाच्या मुद्यावर भाषण केले. या भाषणात त्यांनी विकासाच्या मुद्यावर दिंडोरी – पेठ तालुक्यातील जनतेकडे मते मागितली. ते म्हणाले की, मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा सर्वांनाच झाला पाहिजे ही भूमिका असल्याने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात तीन हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली असल्याने मतदारांनी महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले. ते म्हणाले की, आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करत आहोत. अठरा पगड जातींना सामावून घेऊन ही वाटचाल सुरू केली आहे.

केंद्रात आपल्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे राज्यातदेखील महायुतीचे सरकार असणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासाला गती मिळणार असल्याने महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना विजयी करा. आपले प्रलंबित प्रश्न आगामी काळात सोडवणार असल्याचा ‘शब्द’ आपणास या निमित्ताने देतो, असेदेखील ना. पवार यांनी सांगितले. ही निवडणूक भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ‘भूलथापांना बळी पडू नका, मी शब्द देतो व पूर्ण करतो असा माझा इतिहास’ आहे, असे अजितदादा पवार यांनी नमूद केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ, महिला, युवक, युवती उपस्थित होते.

‘मला हातपाय तोडायची धमकी’; झिरवाळांचा गंभीर आरोप
दिंडोरी । वणी येथे सभेत ना. झिरवाळ यांनी आपल्या भाषणात मला हातपाय तोडायची धमकी आली होती, असे सांगितल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. समाजाच्या प्रश्नात समाजात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, झिरवाळांचे हातपाय तोडले तर एक लाख रुपये देऊ असे म्हटले. बकरी ईदच्या दिवशी बोकड 11 लाखाला जातो तर झिरवाळ बकरा नाही तर झिरवाळ माणूस आहे. बकर्‍यासारखे कुणी घेतले, कुणी हातपाय नाही तोडणार, हातपाय तोडले तर कर्मदास ऋषी पंढरपूरला गरबडत गेले होते, तसे मी समाजासाठी कर्मदास ऋषींप्रमाणे प्रयत्न करेल. तुम्ही चार मतांसाठी तुम्ही चुकीची क्लीप तयार करतात आणि मला शिकवतात. मी तीन वर्षांपासून समाजासाठी कोर्टात झगडतो आणि मला हिंदू महादेव कोळी आणि निव्वळ कोळी समजत नाही का? मला सूची कळते, मला संविधान कळते, विरोधक माझ्यावर नको ते खोटे आरोप करतात, मराठा विरोधक आहे असे आरोप करून जनतेची दिशाभूल करतात व तो नौटंकी करतो तसेच तो कलाकार आहे; परंतु मला तुम्ही जात शिकवत असाल तर मी किती नौटंकी व किती कलाकार आहे हे तुम्हाला दाखवून देईल, असा इशारा झिरवाळ यांनी विरोधकांना दिला. नरहरी झिरवाळ यांच्या पावित्र्याने सर्वच जनतेने झिरवाळ यांना प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद देत नरहरी झिरवाळांच्या विजयाच्या घोषणा दिल्या व घड्याळ्याला मतदान करण्याचा शब्द दिला.

शरद पवारांनी तेव्हा भाजपला पाठिंबा दिला होता मग आता काय बिघडले?
दिंडोरी । ना. नरहरी झिरवाळ यांच्या मागणीनुसार औद्योगिक वसाहतीलादेखील तत्काळ मान्यता दिल्याचे याप्रसंगी सांगितले. नरहरी झिरवाळ हा सच्चा आमदार आहे. आम्ही सर्वांनी सांगितले. 2014 ला तुम्ही भाजपा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला हे चालले. शिवसेनेबरोबर अडीच वर्षे सत्तेत बसले हेही चालले मग भाजपत का नको जायला? असा विचार करूनच महायुतीत सामील झालो. त्यात जयंत पाटीलसुद्धा सहभागी होते व त्यांचीसुद्धा सही होती, असा गौप्यस्फोट अजितदादा पवार यांनी केला. शरद पवारांनीसुद्धा 2014 साली भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे आता काय बिघडले? असे अजितदादा पवार यांनी विचारले. त्यामुळे शरद पवारांची भूमिका जनतेसमोर आली.

कांदा, द्राक्ष पिकावर भाष्य केल्याने शेतकर्‍यांकडून स्वागत
दिंडोरी । अजितदादांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांना हात घातला. त्यांनी शेतकरी विषयावर किमान दहा मिनिटे चर्चा केली. शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. या परिसरात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यांच्या अडचणीदेखील सोडवण्यासाठी आपला आग्रक्रम राहील. तसेच जिल्हा बँकेसंदर्भातदेखील चांगला निर्णय घेऊन लवकरच घेऊ, असे आश्वासनदेखील अजितदादा पवार यांनी याप्रसंगी दिले. शेतकरी, जिल्हा बँक या प्रश्नांवर चर्चा केल्याने शेतकरीवर्ग दादांवर खूश झाला. ते घड्याळाला मतदान देणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

महालेंना दादांचा ‘शब्द’ अन् शिवसेना मताधिक्क्यासाठी सक्रिय
दिंडोरी । माजी आमदार धनराज महाले इच्छुक होते. महायुतीत गैरसमजातून त्यांना शिवसेनेने थेट हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिला, पण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सूचना केली. ‘माघार घे अन् युतीच्या प्रचाराला लाग’, असे सांगितले.‘धनराज महाले सच्चा माणूस’, त्यांनी माघार घेतली अन् ते प्रचाराला लागले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. मीही त्याचा पाठपुरावा करेल व महाले यांच्या त्यागाचे फळ देईल. तरी आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले. अजितदादा पवार यांनी धनराज महाले यांना शब्द देताच ‘एकच वादा अजितदादा, धनराज महाले आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.धनराज महाले यांनीसुद्धा ना. नरहरी झिरवाळ यांना विजयी करण्याचे आश्वासन अजितदादांना दिले. त्यामुळे खेडोपाडी, दिंडोरी-पेठमध्ये धनराज महालेंचे सर्व समर्थक ना. झिरवाळ यांना मताधिक्य देण्यासाठी कामाला लागले आहेत. सर्व शिवसेना सक्रिय झाली आहे.

क्षणचित्रे

  • अजितदादांच्या सभेनंतर वातावरण फिरले; दिंडोरी
    मतदारसंघात घड्याळाचा गजर; झिरवाळांचे पारडे जड
  • अजितदादांच्या सभेत हजारो लाडक्या बहिणींची उपस्थिती
  • मुस्लीम समाज बांधवांचा ना. झिरवाळांना पाठिंबा
  • दोन-चार सुभेदार ठेकेदारांसाठी ‘मविआ’चा आमदार
    चालेल का? : कावळेंचा सवाल
  • आजूबाजूला मतदार उभे बघितल्याने अजितदादांनी डी
    झोनमध्ये बसण्याची परवानगी दिल्याने मतदारांमध्ये उत्साह
  • सभेसाठी प्रचंड जनसमुदाय असल्याने सभा संपल्यानंतर
    वाहतूक ठप्प; पोलिसांची दमछाक
  • रिपाइं कार्यकर्ते व जनतेची प्रचंड उपस्थिती
  • आतापर्यंतच्या सभांमधील सर्वांत मोठी ठरली वणीची सभा
  • व्यापारीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या