नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही
श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. पाच वर्षांनी प्रथमच 132 लिंक कालव्याला वेळेत पाणी सुरू आहे. घोड खालील शेतकर्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्यांशी बोलून घोडचे आवर्तन 18 जानेवारीला सुटत असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
या संदर्भात बोलताना श्री. पाचपुते म्हणाले, घोडच्या आवर्तनाच्या तारखेत शेतकर्यांच्या मागणीनुसार बदल केला आहे. कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना भेटून आवर्तन 18 ला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. विसापूरमधून 16 जानेवारीला आवर्तन सुटेल. 132 मधून सध्या पाणी सुरू आहे. सर्वांचे भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. लाभक्षेत्रातील गावतलाव, पाझर तलावात जेथे गरज असेल तेथे पाणी सोडले जाईल.
घोड-कुकडीच्या नियोजना अभावी मागे शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. नागपूर अधिवेशनाच्या काळात या सरकारकडे आपण पहिली मागणी केली, ती घोड व कुकडीच्या पूर्ण हंगामाच्या नियोजनाची. तसे पत्रही विद्यमान मुख्यमंत्र्यांना आपण पाठवले. त्यामुळे आगामी काळात योग्य नियोजन करून शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
तालुक्यातील ‘खड्डे जैसे थे’च; बिले अदा करू नयेत
खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. काही रस्त्यांची निविदा पूर्ण होऊनही काम सुरू झाले नाही. खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, शिवाय अपघाताला ही सामोरे जावे लागत आहे. काष्टी श्रीगोंदा रोड ची तर भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्डे व्यवस्थित बुजविल्या शिवाय कोणाचीही बिले अदा करू नयेत अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांकडे केली असल्याचे श्री. पाचपुते यांनी सांगितले.