Friday, November 15, 2024
Homeनगरगोदाकाठ महोत्सवात बचतगटांची विक्रमी विक्री

गोदाकाठ महोत्सवात बचतगटांची विक्रमी विक्री

चार दिवसांत झाली चाळीस लाखांची उलाढाल : पुष्पाताई काळे

कोपरगाव (प्रतिनिधी)- बचतगटाच्या महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी गोदाकाठ महोत्सवाच्या प्रवर्तक प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव येथे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सलग चार दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी करून केलेल्या खरेदीमुळे बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची विक्रमी विक्री होऊन चार दिवसात जवळपास चाळीस लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

चला जाणून घेऊ या संस्कृतीच्या पाउलखुणा हे घोषवाक्य असलेला गोदाकाठ महोत्सव शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी सुरू होऊन रविवार दि. 5 जानेवारी रोजी संपणार होता परंतु सलग तीन दिवस झालेल्या अफाट गर्दीमुळे व नागरिकांच्या आग्रहास्तव हा महोत्सव नियोजित कार्यक्रमापेक्षा एक दिवस अधिक वाढवून सोमवारपर्यंत सुरू होता. गोदाकाठ महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आ. आशुतोष काळे व चैतालीताई काळे यांच्याहस्ते बचतगटांच्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी गोदाकाठ महोत्सवात सहभागी झालेल्या बचतगटांच्या महिलांनी महोत्सव काळात झालेल्या व्यवसायाची माहिती दिली.

दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी, लहान मुलांसाठी मोफत विविध प्रकारचे खेळाचे साहित्य, युवा वर्गासाठी सेल्फी पॉइंट, संस्कृतीच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे देखावे व अस्सल मराठमोळ्या जेवणाची चव चाखण्यासाठी नियमितपणे झालेली गर्दी बचतगटांच्या महिलांचा उत्साह वाढविणारी ठरली. खापरावरचे खानदेशी मांडे, सार, शिपी आमटी, थालीपीठ, मासवडी, वांगे भरीत, मिरचीचा ठेचा, ज्वारीचा हुरडा आणि चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकावेळी दोन हजार व्यक्ती खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील एवढी ऐसपैस जागा असून देखील खाऊगल्लीने गर्दीचे विक्रम यावर्षी मोडित काढले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या