Friday, May 3, 2024
Homeनगरनगर – मुकुंदनगरमध्ये कचऱ्याच्या गाडीत किराणा

नगर – मुकुंदनगरमध्ये कचऱ्याच्या गाडीत किराणा

अहमदनगर – कोरोना संसर्ग झालेले आणि संशयित रुग्ण आढळल्यामुळे हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर केलेल्या मुकुंदनगर भागातील लोकांसाठी गुपचुपपणे कचऱ्याच्या गाडीत किराणा माल नेला जात असल्याचे आज सकाळी उघड झाले. विशेष म्हणजे महापालिकेने कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी ठेकेदारांच्या गाडीत हा प्रकार घडला.

मुकुंदनगर हॉटस्पॉट क्षेत्र असल्याने या भागातील सर्व अत्यावश्यक सेवा देखील बंद आहेत. हॉटस्पॉट क्षेत्रची मुदत वाढविण्याचा निर्णय कालच जिल्हाधिकार्यानी घेतला आहे. या ठिकाणी भाजी, किराणा, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी महापालिकेने कर्मचारी नियुक्त केले आहेत. कंट्रोल रूममधील हेल्पलाईन नंबरवर मुकुंदनगरमधील नागरिकांनी आपली मागणी नोंदविल्यानंतर ती सशुल्क पूर्ण केली जाते. या भागातील कोणीही बाहेर आणि बाहेरील कोणीही या भागात जाण्यास मज्जाव आहे. कचरा संकलन अत्यावश्यक असल्याने ही वाहने मुकुंदनगरमध्ये नेण्यास परवानगी आहे. मात्र याच वाहनातून किराणा माल नेला जात असल्याचे आज आढळून आले. महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी ठेकेदाराच्या गाडीतच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अशी दोन वाहने पकडण्यात आले असून महापालिकेत ती जमा केली. गाडीचे वाहनचालकाचे नातेवाईक मुकुंदनगरमध्ये रहात असून त्यांच्यासाठी किराणा नेला जात असल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे येत असल्याचे महापालिका उपायुक्त प्रदीप पठारे यांनी सांगितले. असे जरी असले तरी हा गुन्हाच आहे. संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारण्यात येणार असून त्यानंतर कारवाई ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या