शिक्षकाच्या सुपुत्राचा डंका
पुणे (प्रतिनिधी)- पुण्याच्या छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या कोंभाळणे येथील सुपुत्र असणारा मात्र नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा पैलवान हर्षवर्धन सदगीर हा या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे.
हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा 3-2 असा पराभव करत 63 व्या महाराष्ट्र केसरी 2020 ही मानाची गदा पटकावली. दोस्तीत कुस्ती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही याची प्रचिती महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. हर्षवर्धनचे वडिल एका शाळेत प्रयोग शाळेतील लॅब शिक्षक आहेत.
हर्षवर्धन हा एमएच्या द्वितीय वर्षात शिकत असून, राज्यशास्त्र विषय घेतला आहे. पाच वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवलेले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने शेवटच्या दीड मिनिटात पट काढण्याचा प्रयत्न करून मिळवलेल्या 1 गुणाच्या जोरावर शैलेश शेळकेचा 3-2 गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. मात्र पंचांनी अति बचावात्मक कुस्ती खेळाल्यामुळे शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला होता. त्यानंतर दुसर्या डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावला.
त्यामुळे 1-1 अशी बरोबरी झाली. पण शेवटच्या 30 सेकंदासाठी हा डाव रंगला होता. अखेरच्या 10 सेकंदात डाव टाकत महत्त्वाच्या दोन गुणांची कमाई हर्षवर्धनने केली आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील असलेल्या या दोन्ही मल्लानी आज असंख्य कुस्ती शौकिनांची निराशा केली. या लढतीत शैलेश शेळकेला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेफची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला जिगरी यार व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूरचा शैलेश शेळकेने माती विभागात सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेवर 11-10 अशा अटीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने मॅट विभागात गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला 5-2 ने पराभूत केलं. विशेष म्हणजे शैलेश आणि हर्षवर्धन हे पुण्याच्या काका पवार यांच्या तालमीचे मल्ल आहेत.
या दोघांनीही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात एकत्रच सराव केला आहे. त्यामुळे यंदाची मानाची गदा काका पवार यांच्या तालमीत जाणार हे नक्की होतं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत थरारक निकाल पाहायला मिळाले. गतवर्षीचा विजेता महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला माऊली जमदाडेने चितपट केलं. मग माऊली आणि शैलेश शेळकेची फायनलमध्ये पोहोचण्यासाठी लढत झाली. त्यामध्ये शैलेश शेळकेने बाजी मारली.
तिकडे हर्षवर्धन सदगीरने मॅट विभागात गतवेळचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला हरवून, आधीच फायनलमध्ये धडक दिली होती. दोन्ही मल्ल पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाल्याने, फायनल चुरशीची होईल अशी आशा कुस्ती चाहत्यांना होती मात्र त्यांची निराशा झाली.
सामना सुरू होताच हर्षवर्धनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत शैलेश शेळकेवर वरचष्मा गाजवला. या चित्तथरारक स्पर्धेत हर्षवर्धनने शैलेशवर 3-2ने मात करत ममहाराष्ट्र केसरीफपद खिशात घातलं. हर्षवर्धन सदगीर विजयी होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. त्याच्या सहकार्यांनी त्याला खांद्यावर घेऊन संपूर्ण मैदानातून त्याची मिरवणूक काढली. तर हर्षवर्धनने विजयी झाल्याबरोबर उपविजेत्या शेळके यांना खांद्यावर घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.
दोस्तीत कुस्ती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही असं म्हटलं जातं, याचं दर्शनच या दोन्ही खेळाडूंनी यावेळी कुस्तीप्रेमींना घडवलं. त्यानंतर हर्षवर्धनला शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, माजी खासदार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, अमनोरा संस्थापक संचालक अनिरुद्ध देशपांडे, माजी खासदार अशोक मोहोळ, संग्राम मोहोळ, नानासाहेब बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे सुनील तरटे, कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे , परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, ओलिम्पियन पहिलवान मारुती आडकर, बांदा पाटील, संभाजी वरुटे आदि उपस्थित होते.
यावेळी आगामी होणार्या केसरी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यामध्ये महेश मांजरेकर, निर्माते सुजय डहाके आणि कलाकार उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. अशा मल्लांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
पवार पुढे म्हणाले, यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रची शान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पैलवान तयार होतात. केसरीच्या गदा कोण पटकविणार हे कालपर्यंत जे वाटत होते, त्यांचा सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आलेले असून हीच खरी कुस्तीची किमया आहे. लांडगे म्हणाले, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे. आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल याचा विचार केला पाहिजे.