Wednesday, December 4, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १५ नोव्हेंबर २०२४- ऋणानुबंधाच्या कुठून जुळल्या गाठी..

संपादकीय : १५ नोव्हेंबर २०२४- ऋणानुबंधाच्या कुठून जुळल्या गाठी..

नोव्हेंबर महिना दत्तक जाणीव जागृती महिना म्हणून साजरा केला जातो. जास्तीत जास्त अनाथ मुले दत्तक घेतली जावीत आणि त्यांचे आयुष्य आनंदी,सुरक्षित बनावे याविषयी जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. दत्तक घेण्याची इच्छा असणार्‍या पालकांची संख्या हळूहळू वाढत आहे. राज्यात सुमारे आठ हजार पालकांनी मूल दत्तक घेण्यासाठी नावनोंदणी केल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे.

अनाथाश्रमासारख्या विविध सामाजिक संस्थांमध्ये अनाथ मुले दाखल होत असतात. दाखल न होणार्‍या अशा मुलांची संख्याही जास्त असू शकेल. निश्चित केलेल्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून अनाथ मुले दत्तक घेतली गेली तर त्यांना त्यांचे हक्काचे कुटुंब मिळू शकेल. कुटुंबालाही आनंद आणि समाधान मिळू शकेल. पालकही त्याच भावनेने मूल दत्तक घेतात अशी अनेक कुटुंबे समाजात आढळतात. शून्य ते सहा वयोगटातील मुले दत्तक घेण्याला पसंती आढळते असा या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. ते स्वाभाविकही मानले जाऊ शकेल. छोटे मूल कुटूंबात लवकर सामावले जाते.

- Advertisement -

चिमुकल्याचा स्वीकार करणे, मुलाची जडणघडण करणे, त्याच्यावर योग्य ते मूल्यसंस्कार करणे कुटुंबालाही तुलनेने सहज शक्य होते. त्यामुळे त्यांचा कल समजून घेण्यासारखा असू शकेल. शिवाय दत्तक निर्णय अनाथ मुलांचे भविष्य सुरक्षित करतो. मुले दत्तक घेतली गेली नाही तर ती सामाजिक संस्थांमध्येच मोठी होतात. त्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली की नियमानुसार त्यांना त्या संस्थेत राहाता येत नाही. त्यांना संस्था सोडावी लागते अशा मुलांचे वेगळे प्रश्न निर्माण होतात. तेच मूल योग्य वयात दत्तक घेतले गेले तर त्या कुटुंबाबरोबरच त्याचेही आयुष्य आनंदाने भरून जाते. ‘कारा’ म्हणजेच केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण ही यासाठीची केंद्रीभूत संस्था आहे.

तिच्यातर्फेच दत्तक प्रक्रिया पार पडते. ही संस्था महिला आणि बालकल्याण मंत्रालयांतर्गत काम करते. दत्तक घेण्याची इच्छा ते दत्तकविधान ही प्रक्रिया संथ आणि क्लिष्ट असल्याचे सांगितले जाते. इच्छुक पालकांना काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात. महत्वाची कागदोपत्री कार्यवाही करावी लागते. एका अनाथ मुलाच्या भविष्याचा प्रश्न असतो. तो निर्णय चुकू नये म्हणून अनेक प्रकारच्या पात्रता तपासल्या जात असू शकतील. इच्छुक पालकांची संख्या वाढत आहे. तो निर्णय घेणे अनेकांसाठी सोपे नसते. तथापि एकदा निर्धार पक्का झाला की मूल स्वीकारण्याची उत्सुकता बळावते. कधी एकदा त्यांचे बाळ घरी आणू असेही त्यांना वाटते. मूल दत्तक घेण्याची संधी अशा सर्वांना मिळावी यासाठी दत्तक घेण्याची प्रक्रिया वेगवान व्हावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते आणि इच्छुक पालक व्यक्त करतात. त्यासाठी सामाजिक संस्था आणि सरकार संयुक्तपणे प्रयत्नशील राहील हीच अपेक्षा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या