Thursday, May 2, 2024
Homeनगरजामखेड शहरात चौकाचौकात अन गल्लोगल्ली पोलीस

जामखेड शहरात चौकाचौकात अन गल्लोगल्ली पोलीस

जामखेड (ता. प्रतिनिधी) –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार 10 ते 14 एप्रिलपर्यंत जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. शहरापासून दोन किलोमिटरचा परिसर कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव शहरात तळ ठोकून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात व गल्लोगल्लीमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरात राज्य राखीव दलाचे जवान 100 तर पोलीस कर्मचारी 40 व होमगार्ड 15 तसेच दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक असा एकूण 160 पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. या क्षेत्रातील सर्व किराणा, मेडिकल, पतसंस्था, भाजीपाला, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी 10 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला. शहरातील अंर्तगत रस्ते सील करण्यात आले आहेत.

- Advertisement -

येत्या 14 एप्रिलपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात येत असून शहराच्या मध्यबिंदुपासून जवळपास दोन कि. मी. चा परिसर कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणार्‍या दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. यासाठी जामखेड शहरात अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍यांची नियुक्ती केली आहे.

यामध्ये दुधासाठी नऊ, भाजीपाला पोहच करण्यासाठी पाच, किराणामाल घरोघरी पोहच करण्यासाठी पाच, अ‍ॅम्ब्युलन्ससाठी पाच, औषधे पुरवठा करण्यासाठी दोन, स्वस्त धान्य दुकानातून घरोघरी माल पोहोच करण्यासाठी नऊ, पाणी पुरवठा करण्यासाठी 13 असे शहरात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पथके नियुक्त केले आहेत. या लोकांनी घरोघरी वस्तू पोहच करावयाच्या आहेत. विविध सेवाचे निंयत्रण तहसीलदार विशाल नाईकवाडे व पेट्रोल पंप, गॅस, स्वस्त धान्य दुकान याचे नियंत्रण नायब तहसीलदार नवनाथ लांडगे व औषध व अ‍ॅम्ब्युलन्ससाठी प्रशांत माने, किराणा व पाणीसाठी नंदकुमार गव्हाणे, शासकीय वैद्यकीय सेवा डॉ. युवराज खराडे, खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. भरत दरेकर, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पतसंस्था व बँकसाठी सेवा देणारे देविदास घोडेचोर असे अधिकारी जामखेड शहरासाठी नेमण्यात आले आहेत.

घरोघरी अत्यावश्यक सेवा देणार्‍यांवर अधिकार्‍यांचे लक्ष राहणार आहे. जो कोणी अत्यावश्यक वस्तू घरी पोहच करत नाही, त्या नागरिक व महिलांनी संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांना फोनद्वारे सांगावयाचे आहे. सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक घरपोच मिळण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयातून शहरासाठी सेवानिहाय नोडल अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. या काळात नागरिकांना दूध, भाजीपाला, पाणी, किरणा, औषध या आवश्यक बाबींसाठी शहरातील विभागवाईज पुरवठादाराचे फोन नंबर वितरित केले आहे. आवश्यक लागणार्‍या वस्तूसाठी संबंधिताना संपर्क करावा. घराबाहेर पडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. शहरात वाहन फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

जामखेड शहरातील नागरिकांना आवाहन आहे की कोणीही घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. औषधे, भाजीपाला, किराणा, धान्य, पाणी, दूध, गॅस, वैद्यकीय सेवा, बँक, अ‍ॅम्ब्युलन्स आदी सेवा लागत असेल तर संबंधित अधिकार्‍यांना कल्पना द्यावी. त्यांचे मोबाइल नंबर जाहीर केलेले आहेत. सर्व नागरिकांनी कायदयाचे काटेकोर पालन करा. जो कोणी कायद्याचे पालन करणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
– तहसीलदार विशाल नाईकवाडे

आज 10 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत जामखेड शहर पुर्णपणे सील करण्यात आले आहे. दोन व चारचाकी वाहन शहरातुन पुर्ण पणे बंद केले आहे. कोणी वाहन घेऊन रस्त्यावर व शहरात फिरताना दिसला तर त्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. शिवाय वाहन जप्त करण्यात येईल.
-अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या