कोपरगाव (प्रतिनिधी)– पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापत्पदी अर्जुनराव प्रभाकर काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले होते. आरक्षणानुसार कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापती पदासाठी अर्जुन प्रभाकर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सभापती व उपसभापती पदासाठी केवळ एक एक अर्ज दाखल झाल्यामुळे सभापतिपदी सौ.पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापतिपदी अर्जुनराव प्रभाकर काळे यांची पीठासन अधिकारी पंकज चौबळ यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित सभापती सौ.पौर्णिमा जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित सभापती सौ.पौर्णिमा जगधने म्हणाल्या, आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून दिलेल्या संधीचे सोने करू. उपसभापती अर्जुनराव काळे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मागील अडीच वर्षात केलेल्या प्रयत्नातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. यापुढेही शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
याप्रसंगी माजी सभापती सौ.अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ.विमलताई आगवण, सौ. सोनाली रोहमारे, सौ.सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, कैलास राहणे, सौ. वर्षा दाणे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम,राजेंद्र मेहेरखांब, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, तालुका युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक मंदार पहाडे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद,फकीरमामू कुरेशी, गौतम केन ट्रान्सपोर्टचे ज्ञानेश्वर हाळनोर, बाजार समितीचे उपसभापती राजू निकोले, अशोक खांबेकर, नितीन शिंदे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने मी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडवून सत्ता दिली. माझ्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी मावळत्या सभापती सौ. अनुसयाताई होन व उपसभापती अनिल कदम यांनी अतिशय चांगले काम करून ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवला. विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत देखील बदल घडवला आहे. ग्रामीण भागाच्या विकासाची परंपरा यापुढेही अशीच सुरू ठेवा. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या सहकार्याने ग्रामीण भागाच्या गतीमान विकासाचा रथ असाच प्रगतिपथावर ठेवा.
– आमदार आशुतोष काळे