सहा लाख भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन
पारनेर- राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाची रविवारी यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राम्हणवाडा (ता. अकोले) व बेल्हे (जि.पुणे) येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर व शासकीय महापुजेनंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली.
यात्रोत्सवादरम्यान सुमारे सहा लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले रविवारी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला सुमारे तीन लाख भाविक यात्रेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित होते.
रविवारी पहाटेपासून देवदर्शनाला सुरुवात झाली . सकाळी 9 वा खंडोबाची चांदीची पालखी व अळकुटी,बेल्हे,कांदळी, माळवाडी, सावरगाव घुले, कासारे, कळस येथील मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक दुपारी बाराच्या सुमारास मंदिरासमोर आल्यानंतर पालखी मानकर्यांचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला .दुपारी सव्वादोनच्या सुमारास यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची शाही मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीत हजारो भाविकांची गर्दी झाली होती.
साडेतीनच्या सुमारास दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्याहस्ते काठ्यांची शासकीय महापूजा व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,सरचिटणीस महेंद्र नरड,सरपंच अशोक घुले, विश्वस्त मोहन घनदाट, किसन धुमाळ, अमर गुंजाळ, हनुमंत सुपेकर, चंद्रभान ठुबे, दिलीप घोडके,मनीषा जगदाळे, बन्सी ढोमे,देवीदास क्षीरसागर, किसन मुंढे अश्विनी थोरात, साहेबा गुंजाळ, रामदास मुळे, जालिंदर खोसे, गोपीनाथ घुले, शांताराम खोसे, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह लाखो भाविकांचा जनसागर उपस्थित होता.
शासकीय महापूजा व महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन तर बेल्हे काठीने कळस दर्शन घेतले. यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका पार पडल्या. यात्रेदरम्यान धर्मादाय उपायुक्त हिरा शेळके, धर्मादाय सहाय्यक आयुक्त गीता बनकर, राज्यमंत्री ना.सतेज पाटील यांचे ऑर्डरली जनार्दन आहेर, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, तहसीलदार भारती सागरे, नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, पारनेर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, येथील मोठ्या संख्येने भाविक कोरठणला आले होते.
सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते. पो .निरीक्षक राजेश गवळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था सांभाळली. प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी नेटके प्रशासकीय नियोजन केले, क्रांती शुगर कारखान्याच्या सुरक्षा पथकाने सुरक्षा व्यवस्था सांभाळली,अळकुटी महाविद्यालय व जय मल्हार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाचे काम केले. भाविकांच्या सोयीसाठी एस .टी .कडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.आरोग्य विभाग, अग्निशमन दल यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.