Friday, May 3, 2024
Homeनगरलॉकडाऊनमुळे रखडलेल्या कालव्यांच्या कामांना गती देणार – ना. थोरात

लॉकडाऊनमुळे रखडलेल्या कालव्यांच्या कामांना गती देणार – ना. थोरात

ना. थोरात यांनी केली अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामाची पाहणी

संगमनेर (प्रतिनिधी) – उत्तर नगर जिल्ह्यासह तळेगाव व दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्यातील 0 ते 28 किलोमीटर दरम्यानच्या डाव्या कालव्यांच्या कामाची पाहणी निळवंडे धरणाचे जनक व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये रखडलेल्या या कालव्यांच्या कामांना पुन्हा गती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील बाजार समितीलगत रेडे, मेधके वस्ती, उंचखडक, मेंहदुरी फाटा येथे कालव्यांच्या कामाच्या प्रगतीची सोशल डिस्टंन्स राखून पाहणी केली. यावेळी समवेत कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, उपविभागीय अभियंता प्रमोद माने, तहसीलदार मुकेश कांबळे आदि उपस्थित होते.

1999 मध्ये राज्यमंत्रीपद घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला नामदार थोरात यांनी गती दिली. ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा आदर्शवत पॅटर्न देशाला दिला. अनेक अडचणीवर मात करून 2012 मध्ये धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण केले. या दरम्यान कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा, गणेशवाडी येथील मोठ मोठे बोगद्यांचे कामे मार्गी लावले. मात्र 2014 ते 2020 या काळात तत्कालीन भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे कालव्याची कामे रखडली होती. ही कामे तातडीने सुरू करावी यासाठी कार्यक्षेत्रातून मोठी आंदोलने झाली होती. मात्र भाजपा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर निधीच्या फक्त घोषणा केल्या होत्या. कामे मात्र बंद होती.

मागील सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पद सांभाळताना निळवंडे कालव्यांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले. या कामांची कुठेही प्रसिद्धी न करता लवकरात लवकर ही कालव्यांची कामे मार्गी लावावी यासाठी सर्व संबंधित अधिकार्‍यांना सातत्याने सूचना दिल्या.

मागील चार महिन्यांत अकोले तालुक्यात 0 ते 28 दरम्यान 13 किमीचे माती काम अतिशय जलद गतीने पूर्ण केले. करोना लॉकडाऊनमुळे कामे ठप्प होतील मात्र या कामांना दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये विशेष सवलत देण्यात आली. मनुष्यबळ व साधन सामुग्रीच्या अडचणीतून मार्ग काढत सध्या 17 पोकलंडच्या मदतीने सोशल डिस्टंन्स पाळून ही कामे अतिशय जलद गतीने सुरु आहेत. आज रेडे, मेधगे वस्ती, उंचखडक, मेंहदुरी फाटा येथे सोशल डिस्टंन्स पाळत नामदार बाळासाहेब थोरात यांनी पाहणी करुन झालेल्या कामाबाबद समाधान व्यक्त केले.

उर्वरित कामे तातडीने विना अडथळा लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच निंब्रळ व म्हाळादेवीसह या गावांमध्ये काम बाकी आहे ते जलद गतीने पूर्ण करावे अशा सूचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी विविध कामांच्या बाबींची माहिती दिली.

कालव्यांच्या कामाचा दररोज आढावा
महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्यात अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या असूनही कालव्यांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला आहे. कालव्यांच्या कामाच्या प्रगतीचा दररोज सायंकाळी ते आढावा घेत असून वेळोवेळी सूचना करत आहेत. यामुळे लाभ क्षेत्रामध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या