Friday, May 3, 2024
Homeनगरलोणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे दक्षता वाढली

लोणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे दक्षता वाढली

41 जणांना ताब्यात घेतले; वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतली बैठक; वाहतुकीचे रस्ते बंद; अत्यावश्यक सेवाही केल्या बंद

लोणी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली. तालुक्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लोणीत बैठक घेऊन सूचना केल्या. शनिवारी रात्री कोरोना बाधित रुग्णाचे कुटुंबीय आणि शेजारी राहणारे 35 जण शासकीय यंत्रणेने ताब्यात घेतले. त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना रविवारी सकाळी तपासणीसाठी ताब्यात घेतले. बाधित रुग्णाच्या कुटुंबियांचे तपासणीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. इतरांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

लोणी बुद्रुक येथील विठ्ठलनगर भागातील एक तरुण शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभाग, पोलीस आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा अलर्ट झाली. रात्रीच त्याच्या पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, मेव्हणा यांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्या शेजारी राहणार्‍या कुटुंबांनाही ताब्यात घेण्यात आले. रात्री 35 जणांना ताब्यात घेऊन अहमदनगर येथे पाठवण्यात आले. सकाळी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आणखी 6 जण स्वतः पुढे आले आणि त्यांनी तपासणी करण्याची विनंती प्रशासनाला केली.

लोणी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रीपाद मैड यांनी माहिती देताना सांगितले की, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. इतरांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना विलगीकरन कक्षात ठेवण्यात आले आहे. आडगाव येथेही बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, लोणीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, डॉ. श्रीपाद मैड यांची रविवारी सकाळी लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात बैठक झाली.

त्यात तातडीने उपाययोजना, सर्वेक्षण आणि लोकजागृती करून सोशल डिस्टन्सीग, घरातच राहणे, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णायात उपचार घेणे, जंतुनाशक फवारणी करणे या गोष्टी तातडीने गतिमान करण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या.

दरम्यान लोणीत बाहेर गावाहून येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. विठ्ठलनगरचा परिसर रहदारीसाठी बंद करण्यात आला. गावात महत्वाच्या ठिकाणी दररोज ग्रामपंचायतीच्यावतीने फवारणी करण्यात येत आहे. लोणीतील वैद्यकीय वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. लोणीतील नागरिकांनी बाहेर जाऊ नये व बाहेच्यांनी लोणीत येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. दरम्यान बाधित रुग्णाच्या कुटुंबियांचा काय अहवाल येतो याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या