Thursday, May 2, 2024
Homeनगरगृह विभागाच्या पत्रामागील बोलविता धनी कोण?

गृह विभागाच्या पत्रामागील बोलविता धनी कोण?

मुख्यमंत्र्यांनी याची सत्यता समोर आणावी ; माजी मंत्री आ. विखे पाटील यांची प्रतिक्रीया

लोणी (प्रतिनिधी)- खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी वाधवान परिवाराला कोणत्या तरी बड्या नेत्याच्या सांगण्यावरुनच गृह विभागाने पत्र दिले असल्याचे स्पष्ट होत आहे. पत्र देण्याचे धाडस एकटा गृह विभागाचा सचिव करु शकत नाही. त्यामुळे या पत्रामागील बोलविता धनी कोण? याची सत्यता मुख्यमंत्र्यांनीच जनतेसमोर आणावी, अशी मागणी माजी विरोधीपक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. गावपातळीवर विज बिला अभावी रोहित्रांसाठी शेतकर्‍यांची होत असलेली अडवणूक थांबविण्याची मागणीही आ. विखे यांनी उर्जामंत्र्यांकडे केली आहे.

- Advertisement -

या पत्रातील सत्यता सरकारच लपवुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा थेट आरोप करुन या संदर्भात माध्यमांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, जनतेला पोटासाठी मिळत नाही घास… परंतू श्रीमंताना मात्र महाबळेश्वरचा पास! असेच या घटनेचे वर्णन करावे लागेल. मुळातच एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या लोकांना गृह विभागाचे सचिव महाबळेश्वरला जाण्यासाठी पास देतातच कसे? पण या पाठीमागे बड्या राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याशिवाय हे धाडस होवू शकणार नाही, असा थेट निशाणा साधून मुख्यमंत्र्यांनीच आता यातील सत्यतासमोर आणावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

गावपातळीवर खंडीत होणार्‍या रोहित्रांसाठी शेतकर्‍यांना विजबील भरणे सक्तीचे केले जात असल्याबद्दल आ. विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या गंभीर प्रश्नाबाबत आ. विखे पाटील यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून या कारणामुळे शेतकर्‍यांची होत असलेली अडवणूक लक्षात आणून दिली. विज वितरण कंपनीच्या आधिकर्‍यांना तातडीने निर्देश द्यावेत. विज बिल भरण्याची अट शिथील करावी, अशी केलेली विनंती उर्जामंत्र्यांनी मान्यही केली.
राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक भिषण होत आहे.

सरकार पातळीवर निर्णय होत असलेल्या निर्णयात मोठ्या प्रमाणात विसंवाद दिसत असला तरी यामध्ये आम्हाला राजकारण आणायचे नाही. देशात प्रधानमंत्री आणि राज्यात मुख्यमंत्री या संकटाला सामोरे जाण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबरोबर आम्ही सर्वजण आहोत. वास्तविक बहुतांशी मंत्री मुंबईमध्येच तळ ठोकुन आहेत. मंत्र्यांनी आपआपल्या जिल्ह्यामध्ये जावून जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. मात्र या संकटाच्या काळात काही मुठभर लोक श्रेय लाटण्याचा करीत असलेला प्रयत्न हा किव येण्यासारखा आहे.

येथे श्रेयवादाचा विषय नाही. ही जनतेला आधार देण्याची वेळ आहे. केवळ पाठ थोपटुन घेण्यासाठी फक्त माध्यमासमोर येण्याची धडपड करण्यापेक्षा जनतेला आधार दिला असता तर बरे झाले असते. परंतू आता होत असलेल्या चुकांमधुन येणार्‍या अपयशाचे श्रेय सुध्दा ते घेणार का? याचे उत्तर काळच देईल, अशी टिपणी आ. विखे यांनी केली.

राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना दिलासा देण्याची मोठी गरज असल्याचे नमुद करुन, विज वितरण कंपनीने विज बिल भरण्याची सक्ती न करता रोहित्राची उपलब्धता करुन देवून गाव पातळीवरील विज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या