Friday, May 3, 2024
Homeनगरपैशाच्या वाटणीच्या वादातून विद्युतपंप चोरट्यांचा भांडाफोड

पैशाच्या वाटणीच्या वादातून विद्युतपंप चोरट्यांचा भांडाफोड

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; शेतकर्‍यांनी एकास रंगेहाथ पकडले

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारीची चोरी करणार्‍या टोळीचा पैशाच्या वाटणीवरून झालेल्या वादावादीमुळे चोरीचा भांडाफोड झाला. शेतकर्‍यांनी एकाला रंगेहाथ पकडले असून पाच चोरट्यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पूर्व भागातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत पंप चोरीला जाण्याच्या अनेक घटना झालेले आहेत. शेकटे, भुतेटाकळी, कोरडगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या विहिरीवरील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेलेल्या आहेत.

यामध्ये शेकटे येथील विष्णू गंगाधर घुले, भास्कर हरिभाऊ साबळे, जिजाबा हिराजी घुले, भुतेटाकळी येथील रामहरी त्रिंबक केदार, विठ्ठल त्र्यंबक केदार, दिलीप निवृत्ती फुंदे, प्रल्हाद फुंदे कोरडगाव येथील बाबासाहेब लक्ष्मण दहीफळे, नामदेव किसन पवार, एकनाथ तानाजी फुंदे या शेतकर्‍यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेलेल्या आहेत.

सर्व शेतकरी आपल्या चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक मोटारींचा शोध घेत असतानाच. इलेक्ट्रिक मोटार चोरीच्या टोळीमध्ये पैशाच्या वाटणीवरून वाद झाला. या घटनेची चर्चा परिसरात झाल्यानंतर शेतकर्‍यांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विष्णू रंगनाथ घुले राहणार शेकटे यांनी संशयित पाच चोरट्यांच्या नावानिशी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यामध्ये आपल्या नऊ हजार रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबर परिसरातील इतर शेतकर्‍यांच्याही इलेक्ट्रिक मोटार चोरी गेल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

विष्णू घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी रामनाथ बाबुराव घुले, रामकिसन हरिभाऊ घुले, शरद कालिदास घुले, मारुती साहेबराव घुले राहणार शेकटे व सयाजी महादेव केदार राहणार निपाणी जळगाव यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सयाजी केदार याला शेतकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोमनाथ बांगर पुढील तपास करत आहेत. दरम्यान संशयित आरोपी सयाजी महादेव केदार याला पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या