Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर- मुकुंदनगर, आलमगीरला आले छावणीचे स्वरूप

नगर- मुकुंदनगर, आलमगीरला आले छावणीचे स्वरूप

‘हॉटस्पॉट पॉकेट’मुळे प्रशासन, पोलीस दल सज्ज : सर्व रस्ते बंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील मुकुंदनगर व भिंगारजवळील आलमगीर हे क्षेत्र हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच पोलीसदलाने हा भाग ताब्यात घेत तेथे कठोर उपाययोजनांना सुरूवात केली. या भागातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा व वस्तु विक्री 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा हे आदेश काढले आहेत. हॉटस्पॉट केंद्रात कडक अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, शहर पोलिस आणि महापालिकेने नियोजन केले आहे.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके या भागात लक्ष ठेऊन असन, वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. हॉटस्पॉट केंद्र जाहीर केलेल्या या प्रतिबंधित भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध आणले आहेत. या भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेला वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द केली आहे.

या क्षेत्राच्या मध्यबिंदुपासुन जवळपास दोन किलोमीटरचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्रातील लोकांना बाहेर येण्या-जाण्यास बंधने घातली आहेत. तसेच, या क्षेत्रातून वाहनांची ये-जा करण्यास प्रतिबंध घातला आहे. पोलिसांनी मुकुंदनगर व आलमगीरमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद केले आहे. वाहतूकीसाठी वापरण्यात येणार्‍या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट लावले आहेत.

यामध्ये भिंगार परिसरातील आलमगीर चौक आणि आलमगीरकडे जाणारा रस्ता बाराबाभळीजवळ बंद केला आहे. तसेच मुकुंदनगरकडे जाणारे रस्तेही बंद केले आहेत. यात सार्वजनिक बांधकाम विभागाजवळून जाणारा रस्ता, गोंविदपुरा नाका, पाटबंधारे विभागाजवळ असलेला मुकुंदनगर प्रवेश रोड, पंचवटी हॉटेलजवळील रोड यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट लावले आहेत. तसेच अंतर्गत रस्तेही बांबू आडवे बांधून बंद करून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

मुकुंदनगर व आलमगीरच्या अंतर्गत भागात 14 फिक्स पॉईंट तयार केले आहेत. त्याठिकाणी चोवीस तास पोलीस तैनात असणार आहे. सदर क्षेत्रामध्ये सेवा देणार्‍या सर्व शासकीय कर्मचार्‍यांना संबंधित सनियंत्रण अधिकार्‍यांनी ओळखपत्र दिले आहेत. ओळखपत्राची तपासणी करूनच आत-बाहेर सोडले जात आहे. या क्षेत्रातील लोकांसाठी आवश्यक असणार्‍या दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन पुरविण्यात येत आहे.

यासाठी जीवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. लोकांनी नियमांचे पालन करावे, घरात थांबावे अशा सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात येत आहेत. यासाठी प्रशासनाने तीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. ध्वनिक्षेपन करण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे.

सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी नियुक्त
मुकुंदनगर भागात अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी महापालिकेने कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून, यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात कंट्रोल रूम तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात 47 लिपीक आणि 40 शिपाईंची नियुक्ती केली आहे. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत हे कर्मचारी मुकुंदनगर भागातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू त्याचे शुल्क घेऊन पुरविणार आहेत. यासाठी महापालिकेने 0241- 2343622 आणि 2340522 हे दोन क्रमांक हेल्पलाईनसाठी उपलब्ध करून दिले आहेत. आलमगीर भागात पंचायत समितीचे कर्मचारी जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा करणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली. अत्यावश्यक सेवांसाठी या भागातील नागरिकांनी सकाळी 9 ते 11 या वेळेत 8087852121, 9403546250, 8530566239 या व्हाट्सअप क्रमांकावर आपली मागणी नोंदवायची आहे.

ड्रोनचीही नजर
हॉटस्पॉट केंद्राच्या ठिकाणी तीन अधिकारी, 45 कर्मचारी, 30 होमगार्ड, एसआरपीएफ, आरसीपी च्या दोन तुकड्या तैनात केल्या आहे. चारचाकी, दुचाकी, पायी असे गस्तीसाठी राखीव पोलीस तैनात केले आहेत. गरज पडल्यास आणखी बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके या भागात गस्त घालून परस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच तीन ड्रोन कॅमेराद्वारे हॉटस्पॉट केंद्रावर नजर राहणार आहे.

सेवा मोफत असल्याचा भ्रम
दूध, किराणा, औषधे आदी सेवांची मागणी केली जाते, मात्र त्याचे शुल्क दिले जात नसल्याचा आज पहिल्या दिवशी अनेक कर्मचार्‍यांना अनुभव आला. शहरात सर्वत्र गरजवंतांना मोफत सेवा दिली जात असताना आमच्याकडून पैसे का आकारता, असा सवाल करण्यात आला. महापालिका कर्मचार्‍याची यामुळे अडचण निर्मण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या