Tuesday, May 7, 2024
Homeनगरनगर शहरातील दोघांना करोनाची लागण

नगर शहरातील दोघांना करोनाची लागण

सारसनगर, मुकूंदनगरच्या प्रत्येकी एकाचा समावेश : नगरची संख्या 62

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील शांतीनगर (सारसनगर) येथे दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची 22 वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील 20 वर्षीय युवकाला करोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 62 झाली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून 19 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे दोघे बाधित आढळून आले तर उर्वरित 17 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत. बाधित तरुणीच्या वडिलांचा 13 तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यात या व्यक्तीच्या मुलीलाच करोना झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, शहरातील सुभेदार गल्ली येथील एक वृद्ध महिला दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळून आली होती. याच गल्लीत राहणार्‍या एका युवकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीचा दोन दिवसांर्पू्वीच स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, प्रयोगशाळेने ते रिजेक्ट केल्याने गुरूवारी पुन्हा पाठविण्यात आले होते.

1 हजार 819 जणांची तपासणी
आतापर्यंत 1 हजार 819 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 699 स्त्राव निगेटिव्ह आले तर 62 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. याशिवाय गुरूवारी रात्री परजिल्ह्यातील एक महिलाही बाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. आता 40 व्यक्ती बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत.

जास्ती जास्त तपासणी आवश्यक
जिल्ह्यात हळूहळू करोना आपले हातपाय पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असणार्‍या नगर शहरात 8 ते 9 व्यक्ती करोना बाधित झालेल्या आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्कमधील जास्तीत जास्त व्यक्तींचे नमुने तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच झाले तर करोना बाधित रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्यासोबत कम्युनिटी संसर्ग टाळता येणे शक्य होणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करणे आवश्यक झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या