Monday, May 6, 2024
Homeनगरनगरमधील कापडबाजार आजपासून सुरू होणार

नगरमधील कापडबाजार आजपासून सुरू होणार

व्यापारी भेटल्यानंतर महापालिका आयुक्तांचा आदेश : गंजबाजार, मोचीगल्लीही फुलणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या दाळमंडईतील दुकाने सुरू झाल्यानंतर आता कापड बाजारातील व्यावसायिकांनीही उचल खाल्ली आहे. या संदर्भात येथील व्यापार्‍यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची दुपारी भेट घेतली आणि सायंकाळी आयुक्त मायकलवार यांनी कापडबाजारसह शहरातील इतर बाजारपेठाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास मान्यता दिली.

- Advertisement -

आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त मायकलवार यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्त मायकलवार यांनी सायंकाळी उशीरा एक आदेश काढला. त्यामध्ये बुधवार दि. 27 रोजी कापडबाजारातील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक, नवीपेठेतील श्रीराम कॉम्प्लेक्स ते नेता सुभाष चौक आणि घासगल्लीतील दुकाने उडण्यास परवानगी दिली. तसेच गुरूवार दि. 28 रोजी चितळे रस्त्यावरील तेलीखुंट ते चौपाटी कारंजा, लक्ष्मीबाई कारंजा ते बँक रोड- जुना कापड बाजार, माणिक चौक ते भिंगारवाला चौक आणि शुक्रवार दि. 29 रोजी सारडा गल्ली परिसर, मोची गल्ली परिसर आणि गंज बाजार परिसर उघडण्यास परवानगी दिली आहे.

यामध्ये कंटेन्मेंट झोन आणि बफर झोनमध्ये येणार्‍या भागात ते नियम लागू राहणार आहेत. येथील व्यवसाय सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंतच चालू ठेवता येणार आहे. शिवाय सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. बाजारपेठ किंवा दुकानात गर्दी झाल्यास दुकाने बंद करण्यात येतील, असेही आदेशात म्हटले आहे.
कापड बाजारातील व्यावसायिकांनीही आयुक्तांना भेटण्यापूर्वी आ. संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी सभागृह नेते स्वप्निल शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, मनोज कोतकर, माजी नगरसेवक मनेष साठे, कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीप गांधी, अनिल पोखर्णा, सोनल खंडेलवाल, चंदन तलरेजा, श्री. मुथा, श्री. मुनोत, दीपक नवलानी आदी उपस्थित होते. कापड बाजारातील दुकाने 20 मार्चपासून बंद आहेत. मार्च व एप्रिल महिन्यातील कामगारांचा पगार देण्यात आलेला आहे. यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास व दुकाने बंद ठेवल्यास कामगारांना पगार देणे जिकरीचे होणार असल्याचे व्यापार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिष्टमंडळ भेटण्याचीच गरज होती का?
आ. जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली यापूर्वी दाळमंडईतील व्यापार्‍यांनी आयुक्त मायकलवार यांची भेट घेतली आणि दुसर्‍या दिवशीच दाळमंडईतील दुकाने उघडण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. तसा आदेश काढला. यावेळी मंगळवारी कापडबाजारातील व्यापार्‍यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळीही शिष्टमंडळासमवेत आ. संग्राम जगताप होते. या भेटीनंतर अवघे काही तास गेले नाही, तर लगेच कापडबाजार, गंजबाजार, मोचीगल्ली, चितळे रस्ता येथील दुकाने उघडण्यास परवानगी देणारा आदेश काढण्यात आला. हे व्यापारी अनेक दिवसांपासून मागणी करत होते. मात्र त्यांनी भेटायला यायची आयुक्तांना प्रतिक्षा होती का, अशा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या