अहमदनगर (प्रतिनिधी)- थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणार्या दिल्ली भाजप नेत्याच्या वादग्रस्त पुस्तकावरून नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. तसेच सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्या पुणे येथील महापौरांचाही निषेध नोंदवून महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करुन पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, युवकचे शहराध्यक्ष अभिजीत खोसे, साहेबान जहागीरदार, नीलेश बांगरे, परेश पुरोहित, लहू कराळे, शुभम फलके, सारिका खताडे, लता गायकवाड, मनीषा आठरे, अलिशा गर्जे, उषा सोनटक्के, संगीता कुलट, सुनंदा कांबळे, शीतल राऊत, सुनिता पाचरणे, शितल गाडे, अपर्णा पालवे, सुरेखा कडूस आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असून, त्यांना दैवतासमान मानले जाते. मात्र ‘आज के शिवाजी..’ या पुस्तकाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. हे पुस्तक दिल्ली भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिले असून, त्यांनी या पुस्तकद्वारे शिवप्रेमींसह प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखावल्या आहेत. पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी भाजपच्या मनातील विचार यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रा. विधाते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत असून, त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही.
तसेच सावित्रीबाई फुले यांच्या विषयी देखील चुकीचे वक्तव्य करण्यात आले असून, महापुरुषांविषयी चुकीचे वक्तव्य करणार्या व त्यांचे विडंबना करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. रेशमा आठरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र त्यांच्या विरोधातच आता गरळ ओकली जात आहे. शिवाजी महाराज बहुजन समाजाचे दैवत असून, त्यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी केलेली तुलना चुकीची आहे.