नाशिक : जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि शीघ्र कृती दल (आरएएफ) ची १३० जवांनांची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. चार दिवस शहरात थांबून ईदच्या पार्श्वभूमीवर ही तुकडी मालेगावकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
मालेगाव येथील करोनाचा वेगाने होणारा प्रसार हा नागरीकांसह ग्रामिण पोलीसांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
आतापर्यंत १५० पोलिस कर्मचारी यामुळे बाधित झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मालेगावमध्ये करोना फैलावाचा सर्वाधिक फटका बंदोबस्तावर हजर पोलिसांना बसला. या ठिकाणी १ हजार ४०० पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानास झालेला करोना संसर्ग पुढे नाशिक ग्रामीण पोलिसांपर्यंत पोहचला.
आतापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिस दलातील ८० तर, जालना आणि इतर ठिकाणाहून आलेल्या एसआरपीएफच्या ७० जवानांना करोनाची लागण झाली आहे. तसेच मालेगाव बंदोबस्तासाठी असलेल्या नाशिक शहरातील कोणार्कनगर भागात राहणार्या ५१ वर्षांच्या एका पोलिस कर्मचार्याचा मृत्यू देखील झाला आहे.
दरम्यान, करोनाग्रस्त अथवा करोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या ५० वर्षापुढील पोलीसांना करोनाग्रस्त भागात नियुक्ती देऊ नये असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा ग्रामिण पेलीस प्रशासनाने अशा ६६ जणांना मुख्यालयी नियुक्ती दिली आहे. यामुळे मालेगावी असलेला बंदोबस्त कायम अपुरा ठरला आहे. यामुळे मालेगावसाठी जिल्ह्याला राखीव पोलीस अथवा इतर राखीव तुकड्यांची मदत देण्याची मागणी जिल्हा पोलीस प्रशासनाने शासनाकडे केली होती.
राज्य शासनाने राज्यातील करोनाचा वाढता प्रसार व गेली दोन महिन्यांपासून बंदोबस्तावर सातत्याने असलेले पोलीस यांना काही काळ आराम देण्यासाठी तसेच अगामी येणार्या ईद साठी अधिकचा बंदोबस्त महत्वाचा असल्याने केंद्र शासनाकडे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांची मागणी केली होती. त्यानुसार संपुर्ण राज्यासाठी एसआरपीएफ च्या २० तुकड्या मिळणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. तसेच यातील काही तुकड्या नाशिकसाठी देण्याचे अश्वासनही त्यांनी दिले होत.
आज नाशिक जिल्ह्यासाठी १०० जवान व त्यांना ३० मदतनीस अशी १३० जणांची तुकडी नाशिक शहरात दाखल झाली आहे. ईद पर्यंत नाशिक शहर व परिसरात राहून आवशक्यता पडल्यास हे जवान बंदोबस्त करणार आहेत. तर ईदच्या पुर्वी ही तुकडी मालेगावकडे रवाना होणार असून खास इदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.