Monday, May 6, 2024
Homeनाशिककरोना संसर्गाशी लढताना अर्थचक्र सुरू राहिल याची दक्षता घ्यावी : छगन भुजबळ

करोना संसर्गाशी लढताना अर्थचक्र सुरू राहिल याची दक्षता घ्यावी : छगन भुजबळ

नाशिक : करोना संसर्गाची लढाई ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, यात शासन, प्रशासनासमोर दोन प्रकारची आव्हानं आहेत; पहिले संसर्ग नियंत्रणात आणणे त्यासाठीचे उपचार व दुसरे म्हणजे कोरोना असूनसुद्धा सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवून अर्थचक्र कसे सुरळीत चालू राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील येवल्यासह ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचना आज अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, आरोग्य उपसंचालक पठाणकोट शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे, आदि उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बोलताना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, सुरूवातीला आपल्या जिल्ह्यात एकही कोरोना संसर्गित नव्हता; आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे गरजेचे आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब नमुन्यांचे अहवाल तात्काळ लवकरात लवकर मागवून पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांवर तात्काळ इलाज कसे करता येतील यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील प्रलंबित असलेले स्वॅब नमुन्यांचे अहवाल हे स्थानिक लॅब, आंध्र प्रदेशातील किट पुरवठादार, जे.जे.रूग्णालयात नव्याने कार्यान्वित होणाऱ्या लॅबच्या माध्यमातून तात्काळ कसे प्राप्त करून घेता येतील याचे नियोजन करावे. जेजेमध्ये नव्याने होणाऱ्या लॅबमध्ये दिवसाला 300 नमुन्यांच्या तपासणीची क्षमता नाशिकसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. इतर आजारांचे पेशंट हे कोरोना संशयीत नाहीत, ज्यांना घरीच विलगीकरण, अलगीकरण शक्य आहे त्यांचा व ज्यांना शक्य नाही त्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात यावा, शासनाच्या मार्गदर्शक सूचना गरज लक्षात घेवून अंमलात आणाव्यात.

मालेगावपाठोपाठ आता जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मालेगावसह येवल्याची रूग्णसंख्या चिंतेचा विषय असून तेथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात यावी. संसर्ग ग्रामीण भागात जास्त पसरणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.

दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांबाबत जिल्ह्यात एकसारखेपणा व सुसुत्रता कशी राहील याची काळजी घेण्यात यावी. जेवढ्या अधिक संख्येने दुकाने उघडतील तेवढी कमी गर्दी, जेवढा वेळ जास्त दुकाने सुरू राहतील तेवढी गर्दी कमी याबाबत सारासार विचार करून सर्व यंत्रणांनी आपआपसात संमतीनेच निर्णय घ्यावा.

मुंबई, ठाणे येथून मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर नासिकच्या दिशेने येत आहेत, महिला, मुली, लहान बालके त्यांच्यासोबतच आहेत. ते जात असतील तर त्यांना जावू द्यावे, ज्यांना निवारा गृहांमध्ये राहायचे आहे त्यांना थांबू द्यावे. जाणाऱ्यांसाठी अशासकीय संस्थांच्या माध्यमातून खानपानची पाकीटे उपलब्ध करून द्यावेत, ते या देशांचे नागरिक आहेत, त्यांच्याशी मानवतेच्या भावनेतून प्रशासन व जनतेने व्यवहार करावेत, असे आवाहनही यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या