Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजेईईची तयारी करणाऱ्यांना फेक न्यूजचा मनस्ताप; जुलैमध्ये परीक्षा होणार असल्याची अफवा

जेईईची तयारी करणाऱ्यांना फेक न्यूजचा मनस्ताप; जुलैमध्ये परीक्षा होणार असल्याची अफवा

नाशिक : करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना बसला अहे. परीक्षा नेमक्या कधी होणार यासंदर्भात विद्यार्थी तणावात असतानाच आता त्यांना फेक न्यूजचादेखील सामना करावा लागतो आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जेईई-मेन्ससह विविध परीक्षांच्या बनावट तारखा व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढीस लागला असून, त्यांना नाहक मनस्तापदेखील सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

आयआयटीसह देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई-मेन्सचा दुसरा टप्पा ५ ते ११ एप्रिलदरम्यान होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे एनटीएने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. नवीन तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही. नेमकी परीक्षा कधी होईल हे सांगता येणे शक्य नाही.

त्यामुळे विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्थांमध्येदेखील संभ्रम आहे. यास्थितीत सोशल मीडियावर ही परीक्षा जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला होईल, असे संदेश फिरण्यास सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनीदेखील महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसमध्ये विचारणा सुरू केली. परंतु प्रत्यक्षात त्यांनादेखील काही कल्पना नव्हती.

याबाबत काही जणांनी एनटीएच्या हेल्पलाईन क्रमांकावरच विचारणा केली व तेव्हा ही अफवा असल्याचे लक्षात आले. केवळ जेईई-मेन्सच नव्हे तर इतरही प्रवेश परीक्षांबाबत असाच प्रकार होत असल्याचे समाेर येत आहे.

यासंदर्भात एनटीएने कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जर कुणी असा खोडसाळपणा केला तर त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करण्याचा इशारा एनटीएने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या