Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसिन्नर : सोनांबे येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा मेंढ्यांचा मृत्यू

सिन्नर : सोनांबे येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा मेंढ्यांचा मृत्यू

सिन्नर : चार फूट उंचीचे सरंक्षक जाळीचे कंपाउंड असलेल्या गोठ्यात उडी मारून प्रवेश करत बिबट्याने सहा मेंढ्यांचा फडशा पाडल्याची घटना आज (दि.३) मध्यरात्री सोनांबे येथे घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिन्नर-घोटी महामार्गावर रुंजा बोडके यांचे बंदिस्त शेळीपालन आणि मेंढ्यांचा ओपन गोठा आहे. या गोठ्यात एका बाजूला १६ बोकड बंदिस्त करण्यात आले होते. तर दुसर्‍या बाजूला ओपन गोठ्यात सहा मेंढरे कोंडलेली होती. चार फूट उंचीचे लोखंडी जाळीचे संरक्षक कंपाउंड असलेल्या या गोठ्यास चारही बाजूने बंदिस्त केले आहे. या चार फूट उंचीच्या ओपन गोठ्यात जाळीवरुन पहाटे बिबट्याने उडी मारुन प्रवेश केला. आतील सहा मेंढरांवर हल्ला चढवत बिबट्याने त्यांचा फडशा पाडला.

- Advertisement -

दरम्यान गोठ्या पासून अवघ्या तीस फूट अंतरावर झोपलेला बोडके यांचा मुलगा संदीप हा पहाटे साडेचार वाजता जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला. सर्व मेंढरे मृतावस्थेत पाहून त्याला धक्का बसला.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना कळविण्यात आल्यानंतर वनपाल पी. के. आगळे, वनमजूर बाबुराव सदगीर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शासकीय नियमानुसार या शेतकऱ्यास मदत दिली जाणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून बोडके वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यातच रविवारी रात्री मेंढरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी, परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या