उपसभापतिपदी भाजपच्या मनीषा सुरवसे बिनविरोध; सुरवसे यांच्याकडे प्रभारी सभापतिपदाची सूत्रे
जामखेड (तालुका प्रतिनिधी) – पंचायत समितीच्या सभापती पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री सूर्यकांत मोरे यांचा असताना त्यांनी छाननीपूर्वी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापतिपद पुन्हा रिक्त राहिले तर उपसभापतिपदी भाजपच्या मनीषा सुरवसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी या जिल्हाधिकार्यांना निवडणुकीचा अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी सभापती निवडीचा नवीन कार्यक्रम जाहीर करेपर्यंत रिक्त राहिलेल्या सभापतीचा पदभार उपसभापती मनीषा सुरवसे यांच्याकडे राहणार आहे.
मंगळवार 7 जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृहात सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली. अर्ध्या तासानंतर सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे तर भाजपच्या वतीने डॉ. भगवान मुरूमकर यांनी अर्ज नेला.
परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत दोन्ही बाजूकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. तर उपसभापती पदासाठी कोणीच उमेदवारी अर्ज घेतला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी एकची वेळ ठेवण्यात आली होती; परंतु एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करीत असल्याचे जाहीर करून दुसर्या दिवशी (बुधवारी) पुन्हा निवडणूक प्रक्रिया घेण्यात येईल, असे जाहीर केले.
त्यानुसार बुधवार 8 जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदासाठी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. साडेबाराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या राजश्री मोरे सर्वप्रथम आल्या. त्यानंतर 15 मिनिटांनी भाजपचे डॉ. भगवान मुरूमकर, सुभाष आव्हाड व मनीषा सुरवसे सभागृहात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज घेतला. या उमेदवारी अर्जावर विद्यमान सभापती सुभाष आव्हाड यांनी सुचक व अनुमोदक तर उपसभापती पदासाठी मनीषा सुरवसे यांच्या अर्जावर डॉ. भगवान मुरूमकर यांनी सुचक व अनुमोदक म्हणून सही केलेले अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी राजश्री मोरे तर उपसभापती पदासाठी मनीषा सुरवसे यांचेच उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे सभापती व उपसभापती निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे सभापतिपदी निवड जाहीर होईल. या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण केली. तसेच फटाक्यांची आतषबाजी केली. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव सदस्य राजश्री मोरे असताना त्या सभापती होणार असल्याने त्यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूर्यकांत मोरे यांनी ‘जादूची कांडी’ फिरवली. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु तीन वाजता उमेदवारी अर्जाची छाननी होण्यापूर्वी सभापतिपदाच्या उमेदवार राजश्री मोरे यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. सभापती पदासाठी उमेदवार नसल्याने सदर पद सलग दोनदा निवडणूक कार्यक्रम घेऊन रिक्त राहिले आहे.
यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री माळी यांनी उपसभापती पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज असलेल्या मनीषा सुरवसे यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी करून तो वैध ठरवला व उपसभापतिपदी मनीषा सुरवसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभापतिपद रिक्त राहिल्याने प्रभारी पदभार आपोआपच उपसभापतींकडे येणार आहे.
पंचायत समितीत चार सदस्यांपैकी तीन सदस्य भाजपचे असताना त्यांचा सभापती होऊ शकला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच सदस्य असताना तो सभापती पदासाठी एकमेव अर्ज राहतो यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय मानला जातो. पुन्हा ज्यावेळी निवडणूक कार्यक्रम लागेल त्यावेळी राजश्री मोरे तांत्रिक अडचणी सोडवून सभापती होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूर्यकांत मोरे यांनी बोलून दाखविला. भाजपचे तीन सदस्य असताना सभापतिपद राष्ट्रवादीकडे जात आहे. हा भाजपसाठी व पर्यायाने माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
सभापती पदासाठी राजश्री सूर्यकांत मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता. छाननी तीन वाजता होणार होती. तत्पूर्वीच राजश्री मोरे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सभापतिपद रिक्त राहिले. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांना देण्यात येईल व ते पुढील निवडणूक कार्यक्रम निर्णय जाहीर करतील.
– जयश्री माळी, निवडणूक निर्णय अधिकारी