Thursday, May 2, 2024
Homeनगरनेवाशातील ‘त्या’ 10 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल

नेवाशातील ‘त्या’ 10 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल

नगर, शेवगाव व नेवाशातील मशिदींमध्ये केले मुक्काम; जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशही मोडला
‘तबलिगी’च्या कार्यक्रमात धर्माचा प्रचार व प्रसार करुन पर्यटन व्हिसा अटींचे उल्लंघन’

नेवासा (तालुका प्रतिनिधी/ वार्ताहर)- 30 मार्च रोजी नेवासा येथील मशिदीत मिळून आलेल्या दहा परदेशी नागरिकांवर त्यांनी पर्यटन व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करुन मशिदीत मुक्काम केला तसेच तबलिगी जमातीचे धार्मिक कार्यक्रम तसेच इस्लाम विचारसरणीचे प्रवचन व धर्माचा प्रसार व प्रचार करताना मिळून आल्याच्या तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेश उल्लंघन केल्याच्या कारणावरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 30 मार्च रोजी नेवासा गावातील भालदार (मरकस) मशीदीमध्ये हम्मद अब्दुलकादर बनोटा (वय 33), गुलेद अब्दीलाही अब्दी (वय 31), अब्दुल रज्जाक युनुस आ-हे (वय 37), फरान यासीन बोगोरेह (वय 36), अब्दुल्ला इसे कमील (वय-41) पाचही जण रा. जिबुती देश तसेच अबुदु मामुदु (वय 42) रा. बेनिन देश, कुआसी कौमी मॅक्सीम (वय 44) रा. डिकोटे डिवायर देश, फौफाना सुलेमाने रा. आयव्होरीन देश, बोयासारी अब्दुल गफार (वय 59) रा. आयव्होरीन देश, मेनसहा इस्माईल युसुफ (वय 30) रा. घाना देश हे सर्व जण नेवासा येथील मशिदीत एकत्र आढळून आले. त्यांच्या व्हिसाबाबत माहिती घेता त्यांचे व्हिसा हे पर्यटनासाठी असल्याबाबत माहिती प्राप्त झाली असून सदरचे 10 परदेशी नागरिक हे 8 मार्च रोजी दिल्ली येथून येथून अहमदनगर येथे आले.

8 ते 9 मार्च पर्यंत मुकुंदनगर (अहमदनगर) येथील जामा मशीद येथे वास्तव्य केले. त्यानंतर 10 मार्च ते 11 मार्च या काळात अमरापूर (ता. शेवगाव) येथील मशीदीत मुक्काम केला. त्यानंतर 20 मार्च ते 30 मार्च या काळात नेवासा येथील भालदार (मरकस) मशीदीत थांबून तबलिकी जमातीचे धार्मिक कार्य करुन इस्लाम विचारसरणीचे प्रवचन व धर्माचा प्रचार व प्रसार करताना मिळून आले. त्यांनी त्यांच्या पर्यटन व्हिसामधील अटींचे उल्लंघन केले तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाची माहिती असातानाही सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र येवून कोरोना कोव्हीड-19 रोगाचा फैलाव होईल हे माहिती असतानाही त्यांनी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले.

वरील फिर्यादीवरुन या दहा परदेशी नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 290 सह महाराष्ट्र कोरोना कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 व भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 तसेच परदेशी कायदा 1946 चे कलम 14(ब) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 जणांचा जिल्ह्यातील प्रवास व मुक्काम
नेवाशात आढळलेल्या दहा परदेशी नागरिकांनी दोन दिवस अहमदनगर, दोन दिवस अमरापूर व 11 दिवस नेवाशातील मशिदीत वास्तव्य केले. 8 व 9 मार्च रोजी मुकूंदनगर (अहमदनगर) येथील जामा मशीदीत वास्तव्य. 10 ते 11 मार्च अमरापूर (ता. शेवगाव) येथील मशिदीत मुक्काम. 20 ते 30 मार्च-नेवासा येथील भालदार मशिदीत मुक्काम.

- Advertisment -

ताज्या बातम्या