अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याच्या विविध बाजारांत कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी कांदा 15 ते 22 हजार रुपये क्विंटल होता. लाल कांदा 15 ते 17 हजार रूपये क्विंटल विकला जात होता. आता लाल कांद्याची आवक वाढू लागल्याने ते 1000 ते 5500 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. तर ग्राहकांच्या आवाक्यात कांदा आला आहे. हीच स्थिती लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, पुण्यासह राज्यातील आहे.
काल सोमवारी वांबोरी उपबाजारात 7208 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात 500 ते 5500 रुपयांचा भाव मिळाला. घोडेगावात 19723 क्विं. कांद्याची आवक झाली. भाव 1000 ते 4500 रुपये, शेवगावात 2500 ते 3700 रु., कर्जतमध्ये 900 ते 3750 रुपये क्विंटल विकला गेला.
पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी लाल कांद्याची 22 हजार 890 क्विंटल आवक होती.
तेथे कमीत कमी तीन हजार, जास्तीत जास्त सहा हजार दोनशे आणि सरासरी पाच हजार 300 असा भाव होता. गत आठवड्याच्या तुलनेत तब्बल सहाशे ते आठशे रुपयांची घसरण होती. लासलगाव बाजार समितीत सोमवारी 18776 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी दोन हजार, जास्तीत जास्त पाच हजार 760, सरासरी पाच हजार रुपये भाव होता. मागील आठवड्याच्या तुलनेत कमीत कमी दरात एक हजार व सरासरी दरात अठराशे रुपये असे भाव होते.