राष्ट्रवादी 5, शिवसेना 2, भाजप 2, विखे गट 2, क्रांतिकारी आणि काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी 1 सभापती पद
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्याचे पडसाद आता जिल्हा आणि तालुका पातळीवरील राजकारणावर उमटताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आता पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर जिल्ह्यात 14 पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला सर्वाधिक 5 ठिकाणी सभापती पद आले आहे. तर शिवसेनेकडे 2, भाजप 2, विखे गट 2, काँग्रेस आणि क्रांतिकारी पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापती पद आले आहे.
मंगळवारी पंचायत समित्याच्या सभापती पदासाठी निवड कार्यक्रम झाला. या निवडी दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी आपल्या सदस्यांना व्हिप (पक्षादेश) बजावला होता. या व्हिपमुळे अनेक ठिकाणी पंचायत समिती सदस्यांना पक्षाचा आदेश पाळावा लागला. जिल्ह्यात 14 पंचायत समित्या असून त्यात पाच ठिकाणी राष्ट्रवादीचा सभापती झाला. यात कोपरगाव, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा आणि कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
दोन ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला असून यात नगर आणि पारनेर पंचायत समितीचा समावेश आहे. अकोले आणि पाथर्डीची पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आली असून भाजपमधील विखे गटाच्या ताब्यात राहाता आणि श्रीरामपूरची पंचायत समिती असून काँग्रेसच्या ताब्यात संगमनेरची अवघी पंचायत समिती असून नेवासा पंचायत समिती गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या ताब्यात आहे.
वेळेत अर्ज दाखल न झाल्याने जामखेडच्या पंचायत समितीची निवड रद्द करण्यात आली. आता या ठिकाणी आज पुन्हा निवड कार्यक्रम लावण्यात आलेला आहे. यामुळे आज काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.