- आर्थिक मंजुरीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना साकडे
- पुणे-नाशिक प्रवास होणार अवघ्या दोन तासांत !
- संगमनेर, अकोलेतून पुणे अथवा नाशिक प्रवास तासाभरात !!
- बोटा, जांबुत, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चासला रेल्वेस्टेशन
अहमदनगर- पुणे-संगमनेर-नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र सरकारने पिंक बुकमध्ये घेतल्याने हा प्रकल्प सुुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.(एमआरआयडीसी) ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. हा मार्ग सुरू करता येईल का? यासाठी या कंपनीने पाहणी सुरू केली आहे. त्यानुसार हा रेल्वे मार्ग झाल्यास प्रवाशांना पुण्याहून नाशिकला अवघ्या दोन तासांत जाता येईल. तर नगर जिल्ह्यातील संगमेनर आणि अकोलेतील प्रवाशांना केवळ तासाभरात नाशिक अथवा पुण्याला जाणे शक्य होणार आहे. याचा लाभ उत्तर नगर जिल्ह्यालाही होणार आहे.
या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी देण्याची मागणी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या प्रकल्पासाठी संपादन, निविदा इ. कामाला सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
231 किलोमीटर लांबीचा हा देशातील पहिला हायस्पीड प्रकल्प असणार आहे. सद्यस्थितीत 16 हजार कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पास राज्य व केंद्र शासन 20-20 टक्के या प्रमाणात गुंतवणूक करणार असून उर्वरित रक्कम वित्तीय संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील उद्योग वाहतुकीबाबतचे प्रश्न गंभीर होत असल्याने पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर व्हावा. त्यामुळे हा प्रकल्प होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.सन 2016 मध्ये रेल्वे प्रकल्पास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारचे 50 टक्के आणि केंद्र सरकारचे 50 टक्के अशी खर्चास मंजुरी दिली आहे. 231 किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्प सर्वेक्षणाचे काम व तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत.
या प्रकल्पामुळे पुणे व नाशिक ही दोन्ही महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पास राज्य शासनाने तातडीने मंजुरी देऊन भुसंपादन सुरु करुन हा रेल्वे प्रकल्प मंजुर करावा. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकल्पास अनुकूलता दर्शविली आहे, असे आढळराव यांनी सांगितले. हा मार्ग झाल्यास पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या व्यापार वृध्दीला आणखी चालना मिळणार आहे.
या रेल्वे प्रकल्पात पुणे ते नाशिक दरम्यान एकुण 96 गावांचा समावेश असून 24 रेल्वे स्टेशन राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे, हडपसर, मांजरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकुर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, चास, सिन्नर, मुहधरी, शिंदे, नाशिक या गावांचा समावेश आहे.
नगर – पुणे इंटरसिटी ट्रेन सहा महिन्यांत सुरू होणार
सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत येत्या सहा महिन्यांच्या आत अहमदनगर – पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता यांनी हरजीतसिंग वधवा यांना सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.