श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे खरीप, रब्बी पिकांबरोबर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने हेक्टरी मदत घोषित केली. तिचे हप्ते शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली; मात्र ज्या शेतकर्यांचे बँकेत पीक कर्ज आणि इतर शेती कर्ज थकीत आहे, त्या खातेदार शेतकर्यांना बँकेत ही अनुदान रक्कम दिली जात नसून कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.
राज्य सरकारने कर्ज माफीची घोषणा केली असली तरी बँकेत अनुदान आणि पीएम किसान ची जमा झालेली रक्कम बँकेत कर्ज थकीत असल्याने दिली जात नसल्याची तक्रार येळपणे येथील शेतकर्यांनी केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात घोड, कुकडी कालवा, घोड नदी, भीमा नदी, विसापूर तलाव यामुळे बर्यापैकी मांडवगण गट वगळता शेतीला पाण्याची उपलब्धता होत असल्याने लिंबू, डाळिंब, द्राक्ष फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. तसे पाण्याची उपलब्धता पाहून ऊस लागवड होत असते दोन सहकारी, दोन खाजगी कारखाने बरोबर शेजारचे तालुक्यात ऊस जात असतो.
यंदा दोन्ही सहकारी कारखाने बंद असले तरी ऊस बाहेर जात आहे, असे सर्व असताना शेतीसाठी कर्जाची अवशक्यता असल्याने शेतकरी सहकारी बँक, सेवा संस्था बरोबर राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँकांकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घेत असल्याने श्रीगोंदा तालुक्यात जवळजवळ सर्व बँक शाखा आहेत. इथे शेतकरी कर्जाबरोबर बँकांमध्ये सेव्हिंग खात्यावर आर्थिक व्यवहार देखील करत असतात; मात्र त्याच बँकेत कर्ज खाते आणि सेव्हिंग व्यवहाराची अडचण काही शेतकर्यांना जाणवत आहे.
सध्या शेतकरी अवकाळी पावसाने अडचणीत आला आहे. बँकेचे कर्ज फेडता येत नाही शेतात उत्पादन नसल्याने अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना अवकाळीचे अनुदान सरकारने देण्यास सुरुवात केले आहे. तसेच पी. एम. किसानचे सहा हजार रुपये देखील खात्यात जमा होत असताना बेलवंडी येथील सेंट्रल बँकेत ज्या शेतकर्यांचे पीक कर्ज आहे.
त्या शेतकर्यांना सरकारने दिलेले अनुदान रक्कम खात्यातून काढू दिली जात नाही. कर्ज नील करा, तरच पैसे मिळतील, असे सांगितले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
थकीत कर्जदारांच्या बचत खात्यांना वरूनच लॉक – बँक मॅनेजर
याबाबत बेलवंडी येथील सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी पाटील यांना विचारले असता त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तिथूनच थकीत कर्ज खातेदारांचे बचत खाते लॉक केले असल्याने त्यांना पैसे काढता येणार नाहीत.बँकेचे कर्ज थकीत असल्याने हे कर्ज भरले तरच अनुदान रक्कम सेव्हिंग खात्यातून काढता येईल. आम्हाला काय माहीत हे कसले पैसे आहेत? अनेक शेतकर्यांना लाखो रुपये कांदा विकून आले आहेत हे पैसे ही खात्यात जमा होत असतात. आपण काही करू शकत नाहीत असे त्यांनी संगितले.
दोन्हींकडून शेतकर्यांची अडचण : पवार
याबाबत येळपणे येथील शेतकरी संदीप पवार यांनी सांगितले की सध्या शेती कामासाठी पैशाची गरज आहे. बँकेत सेव्हिंग खात्यात जमा झालेले अनुदान आणि मदत बँकेतून काढता येत नसल्याने उसाची लागवड करता येत नाही आणि पाहिले थकीत कर्ज भरण्यासाठी पैसेही नसल्याने आमची अडचण आहे.