Friday, May 3, 2024
Homeनगरसावेडीच्या रॅन्चोने जोपासला छंद..

सावेडीच्या रॅन्चोने जोपासला छंद..

टाकाऊ वस्तूंपासून विमान, गन, रोबोट, रणगाड्यांची निर्मिती!

अहमदनगर (प्रतिनिधी) – थ्री एडियट चित्रपटातील रॅन्चोंची भूमिका साकारणारा अभिनेता अमिरखान आपल्या वेगळ्या प्रयोगाने सगळीकडे परिचित झाला. तसाच रॅन्चो सावेडीत असून त्यानेही टाकाऊ वस्तूंपासून विमान, गन, रोबोट, रणगाड्यांची निर्मिती करत आपला वेगळा छंद जोपासला आहे. क्षितीज रवींद्र केदारी असे या नगरी रॅन्चोंचे नाव आहे.

- Advertisement -

आई राणी आणि वडील रवींद्र हे खासगी कंपनीत जॉब करतात. त्यांचा क्षितीज हा मुलगा मात्र आपले छंद जोपासात वेगळेपण दाखवित आहे. त्यासाठी तो आई-वडिलांकडे कोणतेच मागणे मागत नाही. घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करत तो आकर्षक अन् थक्क करणार्‍या वस्तू बनवित आहे.

तिसरी इयत्तेत असल्यापासून त्याला हा छंद जडला आहे. चार-आठ आण्यांचे नाणे बंद झाल्यानंतर लाकूड, नाणे अन् कापडांचा वापर करत त्याने सर्वप्रथम बाहुली बनविली होती. आकर्षत दिसणार्‍या बाहुलीचे अनेकांनी कौतूक केले. त्या कौतूकातूनच त्याला प्रेरणा मिळाली अन् गोडीही लागली.

पुढे त्याने विमान, गन, रोबोट बनविला. आता त्याने रणगाडा बनविला आहे. रणगाडा बनविण्यासाठी त्याने पुठ्ठे, बंद पडलेला पेन, पेन्सील, स्केल, वॉटर कलरचा वापर केला. क्षितीज हा अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नागापूर येथील काकासाहेब म्हस्के संकुलाचा तो विद्यार्थी आहे. अभ्यास करत जोडीला त्याने हा छंद जोपासल्याची माहिती त्याचे वडील रवींद्र आणि आई राणी यांनी दिली.

आई-वडीलांचे पाठबळ
आई-वडील दोघंही नोकरीला बाहेर गेले की क्षितीज हा टाकाऊ वस्तूचा शोध घेऊन आपल्यातील कलागुणास वाव देतो. अभ्यास, क्लास केल्यानंतर फावल्या वेळेत तो ही कला जोपासतो. त्याच्या या कलेला आई-वडील दोघांचेही पाठबळ आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या