शिर्डी (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी संपात शिर्डी प्रांताधिकारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, केंद्रीय शासकीय कामगार, वैद्यकीय संघटना यांच्यासह विविध कामगार संघटनांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला.
कामगारांनी केलेल्या या मागण्यांमध्ये कामगार कायद्यातील विपरित बदल तात्काळ रद्द करावेत, सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण मागे घ्यावे, तसेच कामगारांना किमान वेतन दरमहा 21 हजार रुपये करावे व विक्री वैद्यकीय कर्मचारी कायद्याचे संरक्षण करावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
कालच्या या संपात शिर्डी प्रांत कार्यालयातील दहा पैकी 9 जण संपावर गेले होते. राहाता तहसील कार्यालयातील 48 कामगारांपैकी 49 जण संपावर गेले होते. अन्य दोन पूर्व परवानगीने रजेवर गेले आहेत. तर तिघे जण कार्यालयात आढळून आले.
या संपात शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत, राहाता नगरपरिषद येथील कर्मचारी मात्र संपावर न जाता ते कामावर हजर होते. तसेच शाळा महाविद्यालये यांच्यासह काही कर्मचारी संपावर गेलेले नव्हते. त्यामुळे शाळा पूर्णपणे सुरू होत्या.
कालच्या संपात सहभागी झालेले शिर्डी प्रांत कार्यालय, राहाता तहसील कार्यालय येथील कर्मचार्यांसह अंगणवाडी, बालवाडी येथील मदतनीसही संपावर होते.