तीनजण पसार; पाथर्डी तालुक्यातील तिघे तर एक राहुरी तालुक्यातील डिग्रसचा आरोपी
राहुरी (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने राहुरीत आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला राहुरी पोेलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यातील चारजणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र, गर्दीचा फायदा घेत उर्वरीत तीनजण पसार झाले. ही घटना दि. 5 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाजार समिती ते नगर-मनमाड महामार्गावरील बॅलेन्टाईन चर्चसमोर घडली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यास आणखी काही गुन्हे उजेडात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खबर्याने दिलेल्या माहितीवरून राहुरी शहर हद्दीत काही संशयित इसम बाजार समिती परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असल्याची खबर राहुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पोनि. मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच ते संशयित इसम मुळा नदीपात्राच्या दिेशेने पळून जाऊ लागले असता त्यांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. तर तिघेजण पसार झाले. त्यातील एकाचे नाव शंकर शिवाजी पावरा (रा. इंदिरानगर, ता. पाथर्डी) असे असल्याची माहिती टोळीतील आरोपींनी पोलिसांना दिली.
दरम्यान, यातील तिघेजण पाथर्डी तालुक्यातील असून अक्षय सुदाम भले (वय 20) हा राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र मुरलीधर काळे (वय 55, रा. नाथनगर, गोरे मंगल कार्यालयाच्या मागे, ता. पाथर्डी), शकूर बादशहा शेख (वय 36, रा. पांगोरी पिंपळगाव), एक अल्पवयीन (रा. माणिक दौंडी, ता. पाथर्डी), असे या चार आरोपींची नावे आहेत. यातील जितेंद्र काळे याच्यावर पाथर्डी, कराड, जुन्नर, अकोले, तर शकूर शेख याच्यावर भोकरदन, जुन्नर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.
राहुरी पोलिसांनी या टोळीची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक कोयता, दोन चाकू, मिरचीची पूड, आढळून आली. त्यांनी सराफाचे दुकान व तसेच जवळपासच्या दुकानात दरोडा टाकणार असल्याची कबुली पोलिसांना दिली.