ब्रम्हा, विष्णू, महेश असे राज्यात सरकार – नाना पटोले
संगमनेर (प्रतिनिधी)- महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यातील नम्रता व प्रत्येकाच्या हृदयातील असणारे स्थान हे नव्या पिढीसाठी अनुकरणीय आहे. स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढणारे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर पोहचले, असे गौरवोद्गार राजस्थाने उपमुख्यमंत्री ना. सचिन पायलट यांनी काढले.
मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभचे अध्यक्ष ना. नाना पटोले होते तर व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, डॉ. गिरीश गांधी, आमदार डॉ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. हिरामण खोसकर, सत्यशील शेरकर, बाळासाहेब साळुंखे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार कल्याणराव काळे, उद्योगपती राजेश मालपाणी, नामदेवराव पवार, अरुण पा. कडू, माधवराव देशमुख, उद्धव वाघ, विलास औताडे, माजी केंद्रियमंत्री विजय नवल पाटील, करण ससाणे, सचिन गुजर, बाळासाहेब विखे, कांचनताई थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शोभाताई कडू, शरयूताई देशमुख, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख, राजवर्धन थोरात, लताताई डांगे, योगीता शेरकर, सुरेशराव कोते, बाजीराव पा. खेमनर, संदीप गुळवे, रामदास पा. वाघ, लक्ष्मणराव कुटे, भाऊसाहेब कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्या व्यक्तींसाठीचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना व कृषी, शिक्षण, संशोधन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्या व्यक्तींसाठीचा डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम पर्यावरण तज्ज्ञ डॉ. गिरीश गांधी यांना तसेच सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व सौ. योगीता शेरकर यांना स्मृती चिन्ह व एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्काराने यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी ना. सचिन पायलट म्हणाले, देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा व लोकसभेत शेतकर्यांची मुले पाहिजेत. जे शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम करतील, असे सांगतांना, महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाविकासआघाडी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील. ना. थोरात यांनी सहकार, शिक्षण, दूध व्यवसाय यामधून ग्रामीण विकास साधल्यामुळे ते सलग आठव्यांदा मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. नम्रता व जनमाणसांतील हृदयात असलेले स्थान हे नामदार थोरातांच्या यशाचे गमक असून हे सर्व नविन तरुण राजकारणासाठी दिशादर्शक आहेत. महाराष्ट्र व राजस्थानचे पूर्वीपासूनचे विश्वासाचे दृढ नाते आहे. यापुढेही आपल्याला संगमनेर व नगर जिल्ह्यात यायला आवडेल असेही ते म्हणाले.
ना. नाना पटोले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रभाव आहे. शांत व संयमाने सर्वांना ते एकत्रीत पुढे घेऊन जात आहेत. सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार असून या सरकारने प्रथम शेतकर्यांची कर्जमाफी करून एक मोठा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी या नात्याने काम करणार आहे. जनतेची कामे सरकारकडून करून घेणार आहे. 2021 मध्ये जातीनिहाय जनगणना असा ऐतिहासीक ठराव विधानसभेने केला आहे,असेही ते म्हणाले.
राजीव खांडेकर म्हणाले, ना. बाळासाहेब थोरात हे राजकारणातील राम आहेत. सुसंस्कृत, शांत व संयमी माणूस राजकारणात यशस्वी होऊ शकतो याचे ते आदर्शवत उदाहरण आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची तत्वे, सहकार व ग्रामीण विकास विकासासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांनी काम केल्यावर महाराष्ट्र हा देशात अग्रगण्य होईल असा विश्वास व्यक्त करताना सध्या सोशल मीडियामुळे वाढलेली असहिष्णुता दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महसूलमंत्री नामदार थोरात म्हणाले, तिर्थरुप भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी विभागाच्या विकासाचा पाया घातला. भाऊसाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकारात काम केले. त्यांच्या विचारांवर संगमनेर तालुक्याचा सहकार काम करत असून आपला तालुका राज्यात व विकासात अग्रगण्य आहे. तसेच डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे भारत देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.
यावेळी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. गिरीश गांधी व सत्यशील शेरकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उल्हास लाटकर, विजयअण्णा बोर्हाडे, उत्कर्षाताई रुपवते, प्रा. बाबा खरात, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, अजय फटांगरे, सभापती सुनंदाताई जार्वेकर, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर बाबसाहेब दिघे, श्रीकांत मापारी, अशोक खांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले, प्रास्ताविक ना. बाळासाहेब थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर अॅड. माधवराव कानवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. थोरात हे राजकारणातील राम-राजीव खांडेकर
राज्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात हे शांत, संयमी स्वभाव व सुसंस्कृतपणा असलेले नेते आहेत. सर्वांना सोबत घेत सातत्याने विकासाचा ध्यास घेवून आदर्श निर्माण केला असून ना. बाळासाहेब थोरात हे राजकारणातील राम असल्याचे ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी म्हटले आहे.