Friday, May 3, 2024
Homeनगरसाईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा

साईराम सोसायटीला ड्रेनेजच्या पाण्याचा विळखा

सोसायटीवाले पोलिसांत

अहमदनगर (प्रतिनिधी)- तुंबलेल्या ड्रेनेज लाईनमधील घाणीला वाट करून देण्यासाठी नगरसेवक आणि प्रशासनाकडे हेलपाटे मारले पण निरर्थक. अखेर संतापलेल्या साईराम सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांत धाव घेत आंदोलनाचे हत्यार उपसले.पोलिसांनी महापालिकेच्या संबंधितांना खाकीचा खाक्या दाखविताच प्रशासन ‘पाय लावून’ तुंबलेल्या घाणीच्या पाण्याकडे पळाले. संतापलेल्या साईरामकरांना खाकीतील माणुसकीचा असाही सुखद अनुभव आला.

- Advertisement -

शिवाजीनगर परिसरातील साईराम सोसायटीला ड्रेनेजच्या घाण पाण्याने विळखा टाकला आहे. कॉलनीच्या गल्लीबोळात पसरलेल्या पाण्याची दुर्गंधी नकोशी झाली आहे. कल्याण हायवेवरील मेन ड्रेनेजलाईन चोकअप् झाल्याने ड्रेनेजचे पाणी तुंबले. महिनाभरापासून साचत असलेल्या पाण्याचे आता तळे झाले आहे. अनेकांच्या दारापर्यंत घाणीचे पाणी पोहोचले. नागरिकांनी नगरसेवकांकडे धाव घेत कैफियत मांडली.

मात्र निधी नसल्याचे कारण सांगत त्यांनीही हात वर केले. प्रशासनाकडे धाव घेतली पण त्यांनी बेदखल केले. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोकोच हत्यार उपसले. त्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी सोसायटीच्या शंभरऐक नागरिकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी रास्ता रोको करण्यास मनाई केली.

त्याचवेळी तेथे उपस्थित असलेले डीवायएसपी संदीप मिटके यांना नागरिकांनी घटनेचे गांभीर्य सांगितले. खाकीतील माणुसकी जागी होत मिटके यांनी पालिका प्रशासनातील अधिकार्‍यांना फोन लावला. मुलभूत सुविधा आणि तक्रारीचे निरसन करणे महापालिकेचे काम आहे. नागरिक यातना सहन करण्याच्या पलिकडे पोहोचल्याने त्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर पालिकेच्या संबंधित अधिकार्‍याविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम भरत कायदेशीर मार्ग काढण्याची सूचना केली.

पोलिसांतील वरिष्ठ अधिकार्‍याचा फोन आणि गुन्हा दाखल करण्याची तंबी मिळताच महापालिकेच्या अधिकार्‍यांची पळापळ सुरू झाली. स्वच्छता निरीक्षकांनी लागलीच कर्मचारी पाठवून घाणीच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तजवीज सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या