Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेर शहरातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत कायम

संगमनेर शहरातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत कायम

नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कठोर कारवाई – प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे

संगमनेर (प्रतिनिधी)ः- महाराष्ट्र शासनाने 20 एप्रिलपासून काही ठिकाणचे लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले आहेत. मात्र संगमनेर शहरातील लॉकडाऊन स्थिती पूर्वीप्रमाणेच दि. 3 मे 2020 पर्यंत कायम राहणार आहे. जनतेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून येथून पुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे.

- Advertisement -

आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहणार असून प्रवासी टॅक्सी, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस, औद्योगिक आस्थापना, सिनेमा थिएटर, मॉल, व्यायामशाळा, स्विमींग पूल/केंद्र, मनोरंजन केंद्र, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत तसेच सांस्कृतिक, मनोरंजनाचे व धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध असून सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळी सामुदायिक कार्यक्रम, पूजा पाठ, आर्चा यांना मनाई आहे.

अंत्यविधी देखील जास्तीत जास्त 20 व्यक्त्तींच्या उपस्थितीमध्ये सामाजिक अंतर राखूनच पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा जसे रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, पॅथालॉजिकल लॅबोरेटरी, जनावरांचे दवाखाने, त्यांची औषधी दुकाने, शेतीपूरक व्यवसाय, खते, बी बियाणे, किडनाशक औषधी दुकाने, किराणा,भाजीपाला,फळे, धान्य, दूध दुकाने, रेशन दुकाने ही केवळ दुपारी 12 ते 3 या वेळेतच चालू राहतील. घरोघरी, हातगाडीवर, फेरीवाल्यांद्वारे भाजीपाला विक्रीसाठी मुभा राहील. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना मास्क वापरणे तसेच किमान दीड मीटरचे सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी विना मास्क वावरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली असून याबाबी कटाक्षाने टाळाव्यात, अत्यंत निकडीचे काम असल्यासच घराबाहेर निघावे, जीवनावश्यक वस्तू घरपोहोच उपलब्ध होण्याची सुविधा जास्तीत जास्त वापरावी, अत्यंत निकडीच्या कामासाठी घराबाहेर जायचे असेल तरी वाहनाचा वापर टाळावा, साथीचे रोग कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरूळे, पोलीस उपाधीक्षक रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या