देडगावकर सराफाने दिली चोरांना टीप्स
अहमदनगर (प्रतिनिधी) – चोर किती शातीर असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. त्याचा प्रत्यय नगरकरांना आलाय. एका सराफानेच दुसर्या सराफाच्या लुटीच्या दिलेली आयडिया पोलिसांच्या तपासामुळे अंगलट आली आहे. आता लुटीची आयडिया देणारा कोल्हारचे देडगावकर सराफ फरार आहेत. एलसीबी पोलिसांनी ही पोलखोल केली.
नेवासा तालुक्यातील पानेगाव-खेडले रस्त्यावर निखील आंबिलवादे या सराफाला 21 तारखेच्या रात्री लुटले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफिने 9 जणांचा सहभाग असलेली टोळी उघडकीस आणली. आंबिलवादे सराफाला लुटीची आयडिया ही कोल्हार येथील सराफ विजय ऊर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे हा लुटेरे टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. रणनवरेचा जोडीदार शहारूख सय्यद (रा. श्रीरामपूर) याची माहिला नातेवाईक आलिशा आजीज शेख हिची देडगावकराशी ओळख आहे. या महिलेच्या माध्यमातून लुटेरे गँग कोल्हारच्या देडगावकराच्या घरी जमली.
खेडले परमानंद येथील आंबिलवादे या सराफाचे मांजरी येथे श्रीगुरूकृपा नावाचे सराफी दुकान आहे. रात्री तो दुकानातील सोने बॅगमध्ये भरून मोटारसायकलने घरी जातो. रस्त्यात अडवून त्याला मारहाण करा, सोने लुटा, त्याचा मोबादला देऊ असा कट देडगावकरच्या घरात शिजला. त्यानंतर लूट करण्यासाठी टोळी निघाली.
काही दुकानाबाहेर अन् रस्त्यात तीन ठिकाणी गँग विखुरली. आंबिलवादे दुकान बंद करून निघाल्यानंतर एकेक करत एकत्र आले. एकाने रस्ता विचारण्याचा बहाणा करत आंबिलवादे यास थांबविले अन् दुसर्याने त्यांच्या डोेळ्यात मिरची पूड टाकत लूट केली.
लुटीनंतर टाकळीभान मार्गे गॅग श्रीरामपूरातील संजयनगरमधील अलिशा शेख हिच्या घरात एकत्र आली. तिने देडगावकराला फोन करून मोहीम फत्ते झाल्याची माहिती दिली. देडगावकराने सोने घेऊन कोल्हारला येण्याचे सांगितले. शाहरूख सय्यद, निखिल रणनवरे, प्रकाश रणनवरे व अलिशा शेख नॅनो कारने कोल्हारला देडगावकरच्या घरी पोहचले. लुटलेल्या सोन्याचे 5 लाख वीस हजार रुपये देईल असे सांगत देडगावकराने काही पैसे दिले बाकीचे तीन दिवसांत देण्याचे ठरले असल्याची कबुली निखील रणनवरे याने पोलिसांना दिली.
लुटेरे अन् कट करणारी गॅग
निखील शशिकांत रणनवरे (रा. टाकळीभान), सोहेल जुबेर शेख, आवेज ऊर्फ बाबा जुबरे शेख (दोघेही रा. श्रीरामपूर) आणि मतीन गुलाब पठाण (रा. बेलपिंपळगाव, ता.नेवासा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. शाहरूख सांडू सय्यद (रा. बेलापूर), गौरव बारकू अवसरमल, प्रकाश ऊर्फ भावड्या भिमराव रणनवरे (रा. टाकळीभान), आलिशा आजीज शेख (श्रीरामपूर) आणि विजय ऊर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर हे सगळे फरार आहेत.
आठ लाखाचे सोने पाच लाखात
निखील आंबिलवादे यांचे 7 लाख 60 हजार रुपयांचे सोने आणि 30 हजारांची चांदी असे 7 लाख 90 हजाराचा ऐवज या लुटीत लुटला गेला. हे सोने मात्र कोल्हारच्या देडगावकर सराफाने 5 लाख 20 हजार रुपयांना सौदा करत घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.