Friday, May 3, 2024
Homeनगर‘सारी’ व ‘कोरोना’च्या संशयित रूग्णांना राहुरीत मिळणार उपचार

‘सारी’ व ‘कोरोना’च्या संशयित रूग्णांना राहुरीत मिळणार उपचार

राहुरी कृषी विद्यापीठाच्या इमारतीचा ताबा वैद्यकीय अधिकार्‍यांकडे; कोव्हीड केअर सेंटरची स्थापना

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यामध्ये प्रशासनाकडून आगामी काळातही कोरोना रुग्णांवर उपचार व तपासणीसाठी कोव्हीड केअर सेंटरची स्थापना केली जाणार आहे. तर सारी व कोरोना संशयित रूग्णांनाही उपचाराची व्यवस्था केली जाणार आहे. स्त्राव तपासणी राहुरीतच केली जाणार असून रूग्णांवर प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.

- Advertisement -

राहुरी महसूल विभागात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनात मेडिकल असोसिएशनची बैठक झाली. शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. खासगी डॉक्टरांचे पथक शासकीय डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्यास तयार असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.

राहुरीमध्ये कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान केंद्र हे बाह्यरुग्ण विभाग तर बियाणे केंद्र हे स्टोअररूम म्हणून वापरण्यात येणार आहे. यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व विद्यार्थी निवास तसेच शेतकरी निवास भवनही कोव्हीड केअर सेंटर म्हणून वापरात आणले जाणार आहे. कोव्हीड केअर सेंटरमध्ये 600 जणांना उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सारी रोगाचा सर्व्हे सुरू असून खोकला, सर्दी असणार्‍यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी ठेवले जाणार आहे. रूग्णांसाठी एकच बेड असलेली स्पेशल रूम दिली जाणार आहे. कृषी माहिती केंद्रामध्ये केस पेपर काढणे व तपासणी करणे आदी कार्य शासकीय वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे.

खासगी डॉक्टरांनी आठवड्यातून एक दिवस कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी होकार दर्शविला आहे. पूर्वी नगरला स्त्राव चाचणी केली जात होती. परंतु यापुढे राहुरीतच स्त्राव चाचणी केली जाणार असून अहवाल येईपर्यंत संशयित रूग्णांना एकाच रुममध्ये विद्यापीठातील विद्यार्थी निवासामध्ये ठेवले जाईल. अहवाल आल्यानंतर पॉझिटीव्ह आल्यास अभियंता इमारतीमध्ये ठेवले जाईल. तर निगेटीव्ह आल्यानंतर विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन विभागात 14 दिवसांसाठी ठेवले जाईल.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रूग्णांसाठी राहुरी तालुक्यातील नेमलेल्या सेंटरमध्ये ऑक्सिजन व्यवस्था केली जाणार आहे. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे किंवा त्रास होत असल्यास संबंधित रुग्णास नगर येथील सिव्हील हॉस्पिटलला नेण्यासाठी 24 तास अत्याधुनिक रुग्णवाहिका सेंटरपुढे उभी ठेवली जाणार आहे. यासह राहुरी प्रशासनाने आगामी काळातील अडीअडचणींमध्ये वाढ झाल्यास शासकीय अधिकार्‍यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या